मराठी सिनेमाची जगभरात डंका वाजतो आहे. मराठी सिनेमांची कथा आणि आशय याची किर्ती जगभर पोहचली आहे. बॉलीवूडलाही आशयघन मराठी सिनेमांनी भुरळ घातली आहे. त्यामुळेच की आता बॉलीवूडमध्येही आता मराठी सिनेमांचे रिमेक बनू लागले आहेत. यांत आणखी एका मराठी सिनेमाची भर पडली आहे. लवकरच 'मला आई व्हायचंय' या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनणार आहे.
समृद्धी पोरे दिग्दर्शित या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय बॉलीवुडचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजयन यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या स्त्री या सिनेमाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांना मला आई व्हायचंय या सिनेमाची कथा भावली आहे. त्यामुळेच त्यांनी या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून अमर कौशिक यांना भावनिक किनार असलेला सिनेमा बनवण्याची इच्छा होती. त्याचवेळी दिनेश विजयन यांनी अमर कौशिक यांना मला आई व्हायचंय या सिनेमाची कथा ऐकवली आणि त्यांनी लगेचच या सिनेमाच्या हिंदी रिमेकला दिग्दर्शित करण्याची तयारी दर्शवली. त्याच माय-लेकराची पार्श्वभूमी असलेले सिनेमा अमर कौशिक यांना आवडतात. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी हा सिनेमा दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
'मला आई व्हायचंय' या सरोगसी या विषयावर आधारित असणाऱ्या सिनेमाचा 2011 साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. एका विवाहित अमेरिकन मॉडेलला मूल हवं असतं. पण बाळंतपणामुळे बेढबपणा येईल या भीतीने ती सरोगसीचा मार्ग निवडते. भारतात कमी पैशात भाड्याने आई मिळू शकते हे कळल्यावर ती महाराष्ट्रातल्या एका गावात येते. तिथे एका अशिक्षित गरजवंत महिलेची ती निवड करते. सगळं सुरळीत सुरू असतं. पण सहाव्या महिन्यात कळतं की बाळात काही दोष असण्याची शक्यता आहे. हे कळल्यावर ती आपलं बाळ स्वीकारायचं नाकारते अशी या सिनेमाची कथा होती. राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कार पटकावलेल्या या सिनेमानं रसिकांची मनं जिंकली होती. आता हिंदी रिमेक कसा असेल याची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल.