शिवसेनेचे दिवंगत लोकनेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ (Marathi Movie Dharmaveer Mukkam post thane) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. लोकप्रिय मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा अजुनही गर्दी खेचतोय. अनेक ठिकाणी अद्यापही हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. अशात एका चित्रपटगृहात फक्त एकाच माणसाने या चित्रपटाचा शो एन्जॉय केला. ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी त्याने अख्ख थिएटर बुक केलं. होय, प्रसाद ओकने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे.
‘धर्मवीरचा शो पाहण्यासाठी सिनेमागृहात फक्त एकच माणूस???? मराठी कलाकाराच्या बाबतीत किंवा मराठी सिनेमासृष्टीत हे कदाचित पहिल्यांदाच घडलं असावं...! याचं कारण हा व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल...तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये गुरूजी... असंच प्रेम... असाच आशीर्वाद कायम असू द्या, ही विनंती,’असं हा व्हिडीओ शेअर करताना प्रसाद ओकनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.व्हिडीओत सिनेमागृहात एकच व्यक्ती बसलेली दिसतेय. ती व्यक्ती दुसरी कुणी नसून धर्मराज फाऊंडेशनचेआचार्य श्री धर्मराज गुरूजी आहेत. ते प्रसाद ओकचे मोठे चाहते आहेत. प्रसाद ओकचा सिनेमा त्यांना पाहायचा होता पण यावेळेस काहीतरी वेगळं करायचं असं ठरवून ते चित्रपट पाहायला आले.त्यांनी स्वत:साठी अख्खं चित्रपटगृहच बुक केलं.
या व्हिडिओत ते म्हणतात, ‘माझी इच्छा होती की मी एकट्याने हा चित्रपट पाहावा. प्रसाद ओक हे एक उत्कृष्ट आणि अष्टपैलू अभिनेते आहेत. मागे तुम्ही माझ्या फाऊंडेशनसाठी एक व्हिडीओ दिला होता. त्यामुळे आज मी तुम्हाला खास धन्यवाद देण्यासाठी माझ्या एकट्यासाठी सिनेमागृह बुक केलं आहे. मी एकटा इथे बसून चित्रपट पाहतोय. मला या चित्रपटात फक्त आणि फक्त तुम्हाला पाहायचं होतं आणि मला चित्रपट पाहताना कुणाचाही आवाज नको होता. इतर वेळेस आजूबाजूचे कमेंट देतात, बोलतात... मला ते नको होतं. त्यामुळे मी संपूर्ण थिएटर बुक केलं...’
प्रसादने शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आईशप्पथ, क्या बात है, खतरनाक, लय भारी, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी केल्या आहेत.