मंदार चोळकरच्या गाण्यांची क्रेझ तरुणाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 5:42 PM
कविता म्हणजे कमी शब्दात जास्त भावना ! या भावना म्हणजेच प्रेम, विरह, मैत्री, गंभीर आणि साहित्यिक अशा विविध पैलू!....या ...
कविता म्हणजे कमी शब्दात जास्त भावना ! या भावना म्हणजेच प्रेम, विरह, मैत्री, गंभीर आणि साहित्यिक अशा विविध पैलू!....या पैलूंना कवितेत शब्दबद्ध करण्याचे काम कसलेला कवीच करू शकतो. अशा या कसदार आणि सर्जनशील कवींच्या यादीत मंदार चोळकर याचे नावआवर्जून घेतले जाते. सर्वप्रथम चारोळी आणि त्यानंतर कविता रचत गीतलेखनाकडे वळलेला मंदार आज तरुणाईमध्ये सर्वात लोकप्रिय कवी झाला आहे.त्याच्या कविता संगीताच्या माध्यमातून लोकांच्या मुखी रुळलेल्या दिसून येत आहेत. त्याचे दुनियादारी सिनेमातील 'देवा तुझ्या गाभाऱ्याला...' हे दर्दी गाणे असो. वा 'कट्यार काळजात घुसली या सिनेमातील 'मनमंदिरा' हे नाट्यगीत असो, मंदारने प्रत्येक स्तरावर आपल्या गीतलेखनाचा दर्जा उंचावत नेला आहे.चारोळ्यांनी सुरुवात करणाऱ्या मंदार चोळकरने खऱ्या अर्थाने २००९ सालापासून गीतलेखनासाठी सुरुवात केली. चारोळ्याचे कवितामय आयुष्य सुरु असताना योगिता चितळे या गायिकेच्या 'लाइफ इज ब्युटीफुल' या अल्बमसाठी मंदारने लिहिलेल्या एका गाण्याला निलेश मोहरीरने आपल्या संगीतातून आकार दिला. गीतलेखनाच्या या प्रवासात निलेश मोहरीरची मिळालेली ही सोबत मंदारच्या कारकिर्दीसाठी परीसस्पर्श ठरला. त्यानंतर चार ओळींच्या आठ ओळी आणि त्यानंतर कविता अशी दरमजल करत मंदारने आजवर ७० मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे, ज्यात प्रामुख्याने श्यामचे वडिल, दुनियादारी, क्लासमेट्स, मितवा, ऑनलाईन बिनलाईन, शॉर्टकट, गुरू, फ्रेन्ड्स, मराठी टायगर्स, दगडी चाळ, पोरबाजार, कट्यार काळजात घुसली, बंध नायलॉनचे, फुंतरू, पिंडदान, वृंदावन, एक अलबेला, तालीम, कान्हा, फोटोकॉपी, वन वे तिकीट या सिनेमांचा समावेश आहे. तसेच रुस्तुम या हिंदी चित्रपटातील गाण्यांचे देखील मंदारने गीतलेखन केले आहे. विशेष म्हणजे मंदारने म्युजिक अल्बम तसेच काही जाहिरातींसाठीदेखील गीतलेखन केले आहे. सिनेमा यशस्वी करण्यासाठी चित्रपटातील गाण्याचादेखील मोठा वाटा असतो, मंदारने हा वाटा लीलया पेलून धरला आहे.