पोलिस म्हटलं कि, तापट स्वभावाची, असंवेदनशील व्यक्ति अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसात असते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ‘ड्यूटी’ बजावणारा पोलिस हासुद्धा एक माणूस आहे; त्यालाही भावभावना आहेत याचा अनेकदा आपल्याला विसर पडतो. समाजात घडणाऱ्या अनेकविध घटनांकडे पोलिससुद्धा तेवढ्याच सजगतेने, आपुलकीने पहात असतात. आगामी चित्रपट ‘लाल बत्ती’ हा पोलिसांतील याच पैलूवर प्रकाशझोत टाकणार आहे.
२६ जुलै हा ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी ‘लाल बत्ती’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे. नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून अभिनेता मंगेश देसाई यांच्या पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता अजून वाढली आहे.
आपल्या या हटके भूमिकेबाबत बोलताना मंगेश देसाई सांगतात की, प्रत्येक कलाकार खास अशा कलाकृतीच्या शोधात नेहमीच असतो. ‘लाल बत्ती’ सिनेमाच्या निमित्ताने मला एका कर्तव्यकठोर तरीही अतिशय संवेदनशील अशा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारायला मिळणं हे नक्कीच समाधानकारक आहे. या भूमिकेसाठी मी खास ठाण्याच्या QRT टीम कडून (क्विक रिस्पॉन्स टीम) खडतर ट्रेनिंग घेत भूमिकेसाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टी शिकून आत्मसात केल्या आहेत. जनतेसाठी काम करणारे पोलिसच खरे हिरो आहेत, असं सांगत मी साकारलेल्या या भूमिकेमुळे खाकी वर्दीच्या पलीकडचा माणूस प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे.
‘लाल बत्ती’ या चित्रपटात मंगेश देसाई यांच्यासोबत भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत.
‘साई सिनेमा’ ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभले असून चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांचे असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. २६ जुलै ला ‘लाल बत्ती’ प्रदर्शित होणार आहे.