>> ऋचा वझे
कार रेस...! ही काय मुलींनी सहभागी होण्याची स्पर्धा आहे का? असा प्रश्न अनेक जण आपसूकच विचारतील. तर हो, नक्कीच आहे. मुंबईची मनिषा केळकर 'फॉर्म्युला वुमन कार रेसिंग नेशन्स चॅम्पियन कप' स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. मनिषाने मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'ह्यांचा काही नेम नाही' या मराठी सिनेमात ती झळकली होती. अभिनय करत असतानाच तिने फॉर्म्युला रेसर बनण्याचं स्वप्नही पाहिलं. त्यातही तिला यश आलं आहे. 'अभिनेत्री'सोबतच 'कार रेसर' ही तिची वेगळी ओळख निर्माण झाली. रेसिंगचा एकंदर अनुभव, याची नेमकी प्रक्रिया, कसं प्रशिक्षण घेतलं, कोणती आव्हानं आली आणि इथपर्यंतचा प्रवास याविषयी मनिषाने 'लोकमत फिल्मी'शी साधलेला सविस्तर संवाद
अभिनयासोबतच 'कार रेसर' होण्याचा निर्णय कसा घेतला? काय आहे यामागची कहाणी
लहानपणापासूनच मला गाडी चालवायची आवड होती. बाबांच्या मांडीवर बसून मी बरेचदा स्टेअरिंग फिरवायचे. हळूहळू मोठी होत गेले तसं मला एअरफोर्समध्ये जायची इच्छा झाली. तशी तयारीही सुरु केली. पण १२ वी नंतर कळलं की मुलींना फायटर जेट्समध्ये परवानगीच नव्हती. तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. मग २००५ मध्ये मुंबईत पवईला गो कार्टिंग सुरु झालं. ते सहज मी पाहायला गेले होते. तेव्हा कळलं की 'येस, मला हेच करायचं आहे'. आकाशात 'स्पीड' नाही घेता आला म्हणून काय झालं रेसिंग कार आहेत ना असं म्हणत माझा प्रवास सुरु झाला.
मी गो कार्टिंग सुरु केलं. पण काही काळाने मी जिथे ट्रेनिंग घेत होते ते फेडरेशनच बंद पडलं. मधल्या काळात मी मायक्रोबायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर मास कम्युनिकेशन आणि सोशल कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. नंतर अभिनयात प्रवेश केला. माझं कॅमेऱ्यावर प्रेम होतंच. लहानपणापासून घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. म्हणून अभिनय केला. पण कुठेतरी आयुष्यात तो 'स्पीड' मिसिंग होता. २०१७-१८ मध्ये भारतात racers स्पर्धा सुरु झाली. १००० मुलींमधून ६ जणींची निवड झाली. त्यात मी होते. मग आम्हाला प्रशिक्षण मिळालं. आम्ही राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत उतरलो. तिथे फॉर्म्युला फोर कार चालवायला मिळाल्या आणि मग मी मागे वळून बघितलं नाही.
आतापर्यंत मी स्वत:साठी रेसिंग करत होते. पण आता यापुढे मला भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे. फॉर्म्युला वुमन कार रेसिंग नेशन्स चॅम्पियन कप स्पर्धेत मी फायनलला पोहोचली आहे. ती एक वेगळी जबाबदारी आहे. यामध्ये २६ देशांतील ५० मुलींचा सहभाग आहे. १२ डिसेंबरला दुबईत क्वॉलिफायर राऊंड ऑटोडोम ट्रॅकवर झाला. त्यात मला यश आलं आणि मी फायनलला पोहोचले. मे महिन्यात फायनल होणार आहे. फायनलमध्ये रॅडिकल SR3 नावाची फॉर्म्युला कार चालवायची आहे. युके, दुबईला ट्रेनिंग होणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी स्वीडनला ट्रेनिंग आहे जे बर्फावर असणार आहे. बर्फावर प्रशिक्षण घेतल्याने नियंत्रण राखण्यासाठी मदत मिळते.
कार रेसिंगचा सराव करण्यासाठी आपल्याकडे पुरेशा सुविधा आहेत का?
मुंबईत वडाळ्याला एक ट्रॅक आहे. 'रेओ रेसिंग' अशीही त्या ट्रॅकची ओळख आहे. पण प्रत्येक राज्यात तसे ट्रॅक मिळाले तर महाराष्ट्रातूनही महिला रेसर्स पुढे येतील. सध्या ट्रेनिंगसाठी साऊथलाच जावं लागतं. नवी दिल्लीतही चांगला ट्रॅक आहे. भारतात आणखी सुविधा यायला हव्यात. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यावर तिथल्या मुलींसोबत बोलल्यावर हे लक्षात येतं की आपल्याकडे बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे.
या स्पोर्टमध्ये खूप रिस्क आहे. काही वर्षांपूर्वी तुझा अपघातही झाला होता. त्यानंतर कसं कमबॅक केलं?
स्पोर्ट म्हटलं की सकारात्मकच राहावं लागतं. पण आताच्या कार खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केल्या जातात. त्यामुळे व्यवस्थित खबरदारी घेतली, नियम पाळले तर तसं सुरक्षित राहता येतं. माझा मुळात २०१८ मध्ये ट्रॅकवरुन हॉटेलकडे जाताना हायवेवर अपघात झाला होता. माझा ड्रायव्हर खूप रॅश गाडी चालवत होता. मी मागे बसले होते. काही महिने बेडरेस्टच सांगितली होती. डॉक्टरांनी मला 'कार रेसिंग तर विसर' असाच सल्ला दिला होता. माझाही आत्मविश्वास डगमगला होता. वर्षभरानंतर मी कमबॅक केलं. सुरुवातीला मी अगदी बैलगाडीसारखी कार चालवत होते. मला 'पोस्ट ॲक्सिडेंटल ट्रॉमा' झाला. डॉक्टरही काही मदत करु शकत नव्हते. शेवटी मी ट्रॅकवर गेल्यावरच माझा तो ट्रॉमा गेला. माझ्या सरांनीही माझ्यावर खूप विश्वास दाखवला होता.
या प्रवासात फजल सर, जे के टायर्सचे हार्डी सर यांनी मला सुरुवातीला खूप प्रोत्साहन दिलं, शिकवलं. Graeme Glew हे मला फॉर्म्युला वुमनसाठी प्रशिक्षण देत आहेत. तेच या स्पर्धेचे फाऊंडरही आहेत. आईवडीलांनी तर मला कायमच पाठिंबा दिला आहे.
'कार रेसर'ला सुद्धा फिटनेसकडे लक्ष द्यावं लागत असेल. त्याबद्दल काय सांगशील?
मी खूप रॅश ड्रायव्हर होते. अग्रेसिव्ह असायचे. हे सगळं मेडिटेशनमुळे नियंत्रणात आलं. पुढचा टर्न घ्यायच्या आधीच काही सेकंदात आम्हाला विचार करायचा असतो. ते मेडिटेशनमुळेच जमतं. मानसिकरित्या खूप स्ट्राँग व्हावं लागतं. तसंच शारिरीकरित्या फिट राहण्यासाठी नॉर्मल डाएट पाळावं लागतं.
कार रेसर व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींना काय सल्ला देशील?
सुरुवातीला तुम्हाला स्वखर्चाने गो कार्टिंग करावं लागतं. तिथे तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागतं. मग तुमची दखल घेतली जाते. हळूहळू स्पॉन्सरशिप मिळते. त्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. हा असा स्पोर्ट आहे जिथे तुम्ही मुलगी-मुलगा असा फरकच करु शकत नाही. कारण एकदा हेल्मेट डोक्यावर आलं की मुलगी चालवतीये की मुलगा हे कोणी सांगू शकत नाही. सगळं तुमच्या कौशल्यावर अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही आयुष्यात कायम 'पॉझिटिव्ह' राहणं गरजेचं आहे.
'या क्षेत्रात येण्यासाठी मुलींना काहीही प्रश्न असतील तर त्या माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर थेट मेसेज करु शकतात', असं ती म्हणाली आहे. manisharamkelkar हे तिचे इन्स्टाग्राम आयडी आहे.