Join us

'मांजा'सिनेमाला लाभली राष्ट्रीय पुरस्कृत टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2017 12:26 PM

“मांजा” चित्रपट एक सायकॉलॉजिकल थ्रिलर असल्यामुळे त्याला एक वेगळा अंदाज असणे गरजेचे होते. चित्रपट चित्रित होणाऱ्या जागेतील गरजेचा असा ...

“मांजा” चित्रपट एक सायकॉलॉजिकल थ्रिलर असल्यामुळे त्याला एक वेगळा अंदाज असणे गरजेचे होते. चित्रपट चित्रित होणाऱ्या जागेतील गरजेचा असा थंडावा,सौंदर्य आणि शांत वातारवरण हा त्या कथेचा एक अविभाज्य घटक होता. हे सगळं सुयोग्यपणे चित्रित करण्यासाठी एका उत्तम आणि विलक्षण टेक्निकल टीमची गरज होती.कथेसाठी गरजेच्या अशा वातावरणाची आणि त्यातील अनेक रंग सुयोग्यरीत्या कॅमेरामध्ये कैद करण्याकरिता एका उत्तम अशा सिनेमॅटोग्राफर ची गरज होती.अशा सिनेमॅटोग्राफरचा विचार करत असता निर्मात्यांच्या मनात पहिले नाव आले ते ‘फसाहत खान’. त्याचे ‘चिल्ड्रन ऑफ वॉर’ यातील काम पाहून निर्माते आधीच त्याच्या कामाच्या प्रेमात पडले होते. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे शूटिंग सुरु करण्यात आले, फसाहतने शूट करण्यासाठी नवीन आणि जरा हटके युक्ती सुचवली, जमेल तितक्या कमी किंवा लाईटचा वापर न करता वातावरणातील असलेला धुरसट आणि हलका अंधार, ढगाळ वातावरण, धुके आणि त्यात रिमझिम असलेला पाऊस या सगळ्या गोष्टीं योग्यरित्या जुळवून त्याने कथेला हवा असणारा रंग आणि एक वेगळीच अशी सर आणली जी कथेतील पात्रांसाठी गरजेची होती.फसाहत खान यांनी आगामी ‘हसीना पारकर’ या हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण देखील केलं आहे, पण "मांजा" हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप जवळचा असा आहे.सिनेमॅटोग्राफर हे वेगवेगळे प्रयॊग करत असताना कला दिग्दर्शक प्रीतेन पाटील ह्यांनी गोष्टी जितक्या सोप्या आणि सरळ ठेवता येतील याचा प्रयत्न केला. या सगळ्याचा बारकाईने विचार करून कथेतील पात्र आणि त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या पात्रासाठी काय शक्य असेल आणि त्या पात्राला काय शोभेल याचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी सगळ्या गोष्टी मांडल्या. लहान बिस्कीट पासून ते सुटकेस पर्यंत प्रत्येक गोष्ट ही पात्राला पूर्णपणे लक्षात घेऊन देण्यात आली. प्रीतेन यांनी याआधी ‘अशोका दि ग्रेट’, ‘चलते चलते’ आणि ‘नो एन्ट्री’ अशा एक से बढकर एक चित्रपटात काम केले आहे.अशा शैलीच्या चित्रपटासाठी साऊंड डिझाईन करणे हे सिनेमॅटोग्राफी एवढेच आव्हानात्मक होते आणि ते हटके असणे गरजेचे होते. बायलॉन फॉंसेका यांनी ‘रईस’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘क्रिश’ आणि ‘डॉन’, यासारख्या उत्तम दर्जांच्या चित्रपटांसाठी त्यांनी साऊंड डिझाईन केले आहे, त्यांना राष्ट्रीय आणि फिल्मफेअर अशा  पुरस्कारांनी नावाजले आहे. त्यांना 'मांजा' साठी अजून एका धुरंदाराची साथ लाभली ते म्हणजे आलोक डे, जे मिक्सींग ते साऊंड डिझाईन करण्यात पटाईत आहेत आणि त्यांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ‘कहानी’,‘लव्ह आज कल’ आणि ‘जब वी मेट’ अशा हिंदी चित्रपटांसाठी साऊंड डिझाईन केले आहे, नुकताच त्यांना ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला ज्यात त्यांनी बायलॉन फॉंसेकासोबत एकत्र काम केले होते आणि या चित्रपटात एकत्र काम करण्यासाठी दोघेही उत्सुक होते. त्यांना काम हे अगदी उत्तम दर्जाचे हवे होते. यासाठी प्रत्येक ठिकाणचे नैसर्गिक आवाज जिथे शूट चालू होते आणि इतर आवाज जे पात्रांशी आणि कथेशी जुळतील त्यांनी रेकॉर्ड केले ज्यामुळे चित्रपटाला वेगळेच स्वरूप आले. त्यांनी आपल्या सोबत अजून एका अलौकिक अशा व्यक्तीला त्यांचा टीम मध्ये घेतले ते म्हणजे अनुराग सैकिया ज्यांनी चित्रपटाच्या बॅकग्राऊंड स्कोरची धुरा सांभाळली,मराठी चित्रपटात अशा प्रकारचा बॅकग्राऊंड स्कोर या आधी कधी ऐकण्यात आला नसेल. कधीच मराठी भाषेशी त्यांचा संबंध आला नसल्याने त्यांनी चित्रपटातील दृश्य वारंवार पाहिले आणि दिग्दर्शकांकडून त्यातील अनेक बारकावे समजून घेतले, त्यानुसार त्यांनी त्यांचे काम सुरु करून अगदी उत्तमपणे त्यांनी ते निभावले आणि विलक्षणीय असे बॅकग्राऊंड स्कोर त्यांनी दिले.आलोक सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत.त्यांनी ‘बर्फी’, ‘कॉकटेल’ आणि ‘दंगल’ अशा विविध धाटणींच्या चित्रपटात काम केले आहे.जर चित्रपटातील विलक्षणीय ‘जगदंब’ या गाण्याचे संगीतकार शैल आणि प्रीतेशचं आपण कौतुक नाही केलं तर हे सर्व अपूर्ण राहील.देवीचे स्तवन करणाऱ्या या गाण्याचे उदात्त बोल हे मंगेश कागणे यांनी लिहिले आहे.गाण्याचे बोल आणि संगीत अगदी स्वर्गसुखासारखे आहेत. त्यात भर म्हणजे आदर्श शिंदेचा अत्युत्कृष्ट आवाज ज्याने गाण्याला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले आणि भक्तिमय असे वातावरण तयार केले आहे.अशा अनेक विलक्षणीय आणि प्रतिभाशाली व्यक्तींनी एकत्रित येऊन 'मांजा' हा चित्रपट घडविला आहे. विषयाची मांडणी, उत्कृष्ट कलाकार आणि चित्रपटाशी निगडीत असेलेल्या प्रत्येकाचे योगदान हे सर्व पाहता चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरतोय.