प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. अनेक रील्स शेअर करण्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ते चाहत्यांना देत असतात. नुकतंच मंजिरीने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे.
रिक्षातून प्रवास करताना आलेला अनुभव मंजिरीने सांगितला आहे. मंजिरीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन रिक्षाचालकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रिक्षा चालवताना रिक्षा चालक मोबाईलवर रील बघत असल्याचं दिसत आहे. मंजिरीने सांगूनही रिक्षा चालकाने तिचं ऐकलं नाही. शेवटी तिला रिक्षा बदलावी लागली. तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितला आहे. "पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन, असा प्रवास का करायचा? आणि ह्यावर ह्यांना काही बोलायचं नाही. कारण यांचीच अरेरावी ऐकून घ्यायला लागेल", असं मंजिरीने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली आणि तरीही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल, समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन, पण मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला...एकूणच कठीण आहे सगळं...देव त्याला अक्कल देवो".
मंजिरीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी असा प्रसंग त्यांच्यासोबतही घडल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे. "हा प्रकार वाढलाय आणि त्यांची अरेरावी सुद्धा", "ठाण्यात जास्त झालंय आजकाल...ठाणे स्टेशन पासून जाणाऱ्या सर्व रिक्षा चालक सर्रास मोबाईल वापरतात" असं म्हणत चाहत्यांनी मंजिरीला पाठिंबा दर्शविला आहे.