प्रसाद ओक आणि मंजिरी ओक ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. प्रसादच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये मंजिरीचा मोठा वाटा आहे. पडत्या काळातही मंजिरीने भक्कम साथ दिल्याचं अनेकदा प्रसादने मुलाखतीतही सांगितलं होतं. प्रसाद आणि मंजिरीने 'हिरकणी' सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं. या सिनेमातील एका गाण्यात मंजिरी दिसली होती. त्याबरोबरच तिने या सिनेमासाठी प्रसादला असिस्टही केलं होतं. एका मुलाखतीदरम्यान मंजिरीने 'हिरकणी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग सांगितला होता.
मंजिरीने 'हिरकणी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. 'आसोवा' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मंजिरीने 'हिरकणी' सिनेमाच्या सेटवर घडलेला प्रसंग सांगितला होता. एका सीनदरम्यान प्रसाद सेटवरच सगळ्यांसमोर मंजिरीला ओरडला होता. 'हिरकणी'च्या सेटवर घडलेला प्रसंग सांगत मंजिरी म्हणाली, "'हिरकणी'च्या शूटिंगच्या तिसऱ्या दिवशी हा प्रसंग घडला होता. मोंटाज सुरू होता. सोनाली गरोदर असते. ती एका कठड्यावर बसते आणि एक बाई येते. तिच्या हातात कळशी असते आणि ती तिला पिण्यासाठी पाणी ओतते, एवढाच शॉट होता. रणरणत्या उन्हात शूटिंग सुरू होतं. माझ्यासाठी साडी महत्त्वाची होती. कारण, पुढेदेखील काही सीन्स करायचे होते. ती साडी कोरडी असतानाही हाताला रंग लागत होता. तर पाणी ओतताना दोन थेंब त्या साडीवर सांडले. तर आता ओला रंग पण लागणार. म्हणून मी सीन चालू असतानाच "ए माझी साडी" असं ओरडले."
"शूटिंगचा तिसराच दिवस होता. पण, माझ्या लक्षात नाही आलं. त्यानंतर प्रसादने माझी एवढी काशी केली. तो मला इतकं बोलला की पुढचे दोन तास अख्या युनिटमध्ये एकही आवाज नव्हता. पुढे सगळे सीन पटापटा झाले. इतके सगळे घाबरले होते. गडावर ताक आणि दही विकणाऱ्या झोपड्या असतात. त्या झोपड्यांच्या पाठीमागे जाऊन मी खूप रडत होते. सोनाली मागे येऊन मला समजावत होती. मंजिरी ताई ठिके...तो आता प्रेशरमध्ये आहे. पण, मला या सगळ्याची सवयच नव्हती," असंही पुढे मंजिरीने सांगितलं.
प्रसाद ओकने दिग्दर्शित केलेला 'हिरकणी' सिनेमा २०१९ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, क्षिती जोग, ऐश्वर्या राजेश, मकरंद देशपांडे, चिन्मय मांडलेकर अशी स्टारकास्ट होती.