Join us

मनोज जोशींची डिजिटल माध्यमात एन्ट्री, म्हणाले - डिजिटल माध्यमालाही हवेत निर्बंध

By तेजल गावडे | Published: November 07, 2019 6:03 PM

अभिनेते मनोज जोशी यांची 'फादर्स व्हॉल्यूम २' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते मनोज जोशी यांची 'फादर्स व्हॉल्यूम २' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे या वेबसीरिजबद्दल थोडक्यात सांगा?हल्लीचा तरूण वर्ग डिजिटल माध्यम खूप फॉलो करतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे व वेबसीरिज बनत आहेत. तशीच माझीदेखील पहिली वेबसीरिज 'फादर्स व्हॉल्यूम २' नुकतीच टीव्हीएफवर प्रदर्शित झाली आहे. डिजिटायझेशनच्या युगात वडील आपल्या मुलांसोबत कसे जुळवून घेतात आणि मुलांसोबत जुळवून घेण्यासाठी पालकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे या सीरिजमधून दाखवण्यात आलं आहे. तसेच आजूबाजूला झालेल्या बदलांना स्वीकारणंदेखील महत्त्वाचं आहे. या सीरिजमधून खूप छान मेसेज देण्यात आला आहे. ही खूप छान व मजेशीर सीरिज आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ही सीरिज पाहू शकतो.

या सीरिजमधील तुमच्या भूमिकेबद्दल सांगा?यात मी श्रीवास्तव नामक वडिलांची भूमिका साकारली आहे. जो खूप हुशारक्या मारणारा आहे. जगासमोर भलेही हुशारक्या मारत असला तरी घरात बायकोसमोर la चिडीचूप असतो. या सीरिजमध्ये माझ्यासोबत राकेश बेदी व वीरेंद्र सक्सेना मुख्य भूमिकेत आहेत. तिनही पात्र वेगवेगळी आहे. हे तिघे मित्र आहेत आणि त्या तिघांचे स्वभाव खूप भिन्न आहे. 

या सीरिजचा अनुभव कसा होता?मी पहिल्यांदाच वेबसीरिजमध्ये काम केले आहे. पबजी नामक गेम आहे आणि टिंडर नामक वेबसाईट आहे जिथे डेटिंग केलं जातं हेदेखील मला माहित नव्हतं. त्यामुळे या डिजिटल माध्यमाबद्दल मला जाणून घेता आले. मर्डर, अश्लील शब्द व सेक्स या गोष्टींचा वापर न करता टीव्हीएफने ही सीरिज बनवली आहे. त्यामुळे ही सीरिज कोणत्याही वयोगटातील व्यक्ती पाहू शकतो. दिग्दर्शक व लेखक सगळे तरूण होते. आमच्यापेक्षा वयाने दुप्पट लहान असलेल्या मुलांनी इतकी क्रिएटिव्ह सीरिज बनवली आहे. मला त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली.

डिजिटल माध्यमाला निर्बंध असायला पाहिजे, असे तुम्हाला वाटते का?मला वाटतं की कुठंतरी निर्बंध असायला हवा. पाश्चिमात्य गोष्टींचं अनुकरण करणं गरजेचं नाही. या माध्यमावर निर्बंध कसा घालता येईल, हा खरंतर चर्चेचा विषय आहे. परिणाम व दुष्परिणाम प्रचंड प्रमाणावर आहे. डिजिटल माध्यमाचा वापर १८ वर्षांखालील व्यक्तीदेखील करतात. त्यामुळे चित्रपटांप्रमाणे त्याला वयाची मर्यादा असायला पाहिजे. 

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत, तर तुमचा आवडता जॉनर कोणता?मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तरी कॉमेडी भूमिका माझ्या जास्त वाट्याला आल्या आहेत. कलाकारांला कोणत्याही मर्यादा नसल्या पाहिजेत आणि मी कोणत्याही भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. मला वेगवेगळ्या भूमिका साकारायला आवडतात. 

आगामी प्रोजेक्टबद्दल सांगा?सध्या 'हंगामा २' चित्रपटाचं काम करतो आहे. तसंच एका मोठ्या बॅनरच्या चित्रपटात काम करतो आहे. त्याबद्दल आता सांगणं योग्य ठरणार नाही. एक मराठी चित्रपट करतो आहे. तसेच एका गुजराती सिनेमातही काम करतो आहे. एका नाटकाचे प्रयोग चालू आहेत.  

टॅग्स :मनोज जोशी