'माणुसकीच्या भिंती'ने कच-यापासून घेतला मोकळा श्वास,शशांक केतकरच्या पोस्टनंतर प्रशासनाला जाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 5:31 AM
छोट्या पडद्यावरील सा-यांचा लाडका अभिनेता श्री अर्थातच शशांक केतकर याने अस्वच्छता पसरवणा-यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला ...
छोट्या पडद्यावरील सा-यांचा लाडका अभिनेता श्री अर्थातच शशांक केतकर याने अस्वच्छता पसरवणा-यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता. यावेळी त्याने पुण्यातील सिंहगड रोडवर एका पूलाखाली उभारण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाची झालेली दूरवस्था जगासमोर आणली होती. या ठिकाणी नागरिकांनी त्यांचे विनावापराचे कपडे स्वच्छेने या ठिकाणी आणून ठेवणं अपेक्षित होतं. जेणेकरुन हे कपडे समाजातील गरजूंना वपरता येतील. 'जे नको असेल ते द्या, हवं असेल ते घेऊन जा' अशी ओळही माणुसकीच्या भिंतीवर लिहिण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी घाण टाकून माणुसकीची भिंत या संपूर्ण संकल्पनेला कशाप्रकारे हरताळ फासला आहे हे शशांकने फोटोच्या माध्यमातून जगासमोर आणलं होतं. शशांकने आपल्या पोस्टमध्ये अस्वच्छता पसरवणा-यांना खडे बोल सुनावले होते. शशांकच्या या पोस्टचा इफेक्ट म्हणा किंवा आणखी काही. लगेचच या ठिकाणचं चित्र पालटलं आहे. अस्वच्छ झालेला हा परिसर स्वच्छ करण्यात आला. इतकंच नाही तर या ठिकाणी भिंतीभोवती उंच अशी जाळीही उभारण्यात आली आहे. ज्या पद्धतीने अस्वच्छ झालेल्या माणुसकीच्या भिंतीचं चित्र शशांकने जगासमोर आणलं, त्याच पद्धतीने या ठिकाणी झालेला बदलही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सा-यांसमोर आणला आहे. या बदला संदर्भातील फोटो आणि एक पोस्ट शशांकने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. "काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टचा परिणाम असेल, नसेल माहित नाही. मात्र बदल झाला आहे आणि जो स्वागतार्ह आहे. सकारात्मक बदलाचं कौतुक करायला हवं. पुणे महापालिकेचे आभार" अशा शब्दांत शशांकने आपल्या भावना पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. या ठिकाणी भिंती भोवती जाळी उभारण्यात आल्याची माहितीही त्याने दिली आहे. शशांक एवढ्यावरच थांबला नाही. या जाळीबाहेर कचरा टाकून हा परिसर अस्वच्छ करु नका असं आवाहनही त्याने पुणेकर आणि नागरिकांना या पोस्टच्या माध्यमातून केले आहे. शशांकच्या या पोस्टवर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.