मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचं निधन होऊन आज बरीच वर्ष झाली. मात्र, त्यांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलांनीही सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. लक्ष्मीकांत यांचा थोरला लेक अभिनय (abhinay berde) याने 'ती सध्या काय करते' या सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर अभिनय अल्पावधीत लोकप्रिय झाला. परंतु, बऱ्याचदा त्याच्या कामाची तुलना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत केली जाते. यावर त्याने प्रथमच भाष्य केलं आहे.
अभिनय लवकरच बॉईज ४ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या फिल्मी करिअरविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ही मुलाखत सुरु असताना 'लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा असल्याने तुझी तुलना केली जाईल, जर कधी काम आवडलं तर काय, याचं कधी दडपण वाटतं का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
वडिलांसोबत होणाऱ्या तुलनेवर काय म्हणाला अभिनय?
"माझ्यासोबत कायम या गोष्टी घडतात. त्या नेहमीच घडत राहणार याची मला खात्री आहे. त्यामुळे मी त्या गोष्टी स्वीकारल्या आहेत. माझ्या हातात ती गोष्ट नाही. माझ्या हातात फक्त प्रमाणिकपणे काम करत राहणं इतकंच आहे. त्यामुळे मी तेच करतो. मी माझ्या परीने जमेल तितकं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो", असं अभिनय म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "जर लोकांना ते आवडलं तर चांगलं आहे. पण, जर लोकांना आवडलं नाही तर मी त्यांची माफी मागतो. तुम्हाला अजून चांगलं देण्यासाठी मी प्रयत्न करेन. सध्या मी एवढंच सांगतो, की लोकांना माझ्याकडून जे पाहायचं आहे त्याच्यापेक्षा मला त्यांना काय द्यायचं आहे यावर सध्या मी जास्त लक्ष फोकस केलं आहे. लोकांना माझ्याकडून सगळ्याच गोष्टींची अपेक्षा असते. पण, जर त्या सगळ्या गोष्टी मी केल्या तर त्यात मी चांगला दिसणार नाही."
दरम्यान, ती सध्या काय करते या सिनेमातून अभिनयने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.