मराठी कलाविश्वातील हँडसम अभिनेता म्हणून आजही अजिंक्य देव (ajinkya deo) यांच्याकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. इतकंच नाही तर लवकरच ते नितीश तिवारी यांच्या रामायण आगामी सिनेमात झळकणार आहेत. अलिकडेच त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील स्पर्धा, चढाओढ या सगळ्यावर भाष्य केलं आहे. इतंकच नाही तर आपलीच माणसं आपल्याला दुर्लक्षित करतात असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.अलिकडेच अजिंक्य देव यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी कलाविश्वात काम करतांना कशा प्रकराचे अनुभव येतात, गेल्या काही काळात इंडस्ट्रीमध्ये कसा बदल झाला आहे. या सगळ्यावर सविस्तर भाष्य केलं. तसंच येणाऱ्या काळात ते कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं. यावेळी बोलत असताना आजही इंडस्ट्रीत स्ट्रगल करावा लागतो हे त्यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले अजिंक्य देव?
कलाकार म्हणून आजही इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल सुरु आहे का? असा प्रश्न अजिंक्य देव यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी अमिताभ बच्चन आणि रमेश देव यांचा एक किस्सा सांगितला. "100 टक्के संघर्ष करावा लागतो. एक आठवण सांगतो. मी आणि बाबा एकदा अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, 'आजही तुम्ही इतकं काम करता थोडा आरामही करा!' त्यावर ते त्यांच्या शैलीत म्हणाले,‘रमेश देव जी मला माझं घर चालवायचं आहे. मला काम करावं लागतं.’ हे सांगण्यामागचं तात्पर्य काय की इतका मोठा कलाकार असूनही ते असं म्हणतात तर त्यांच्या पुढे मी कोणीच नाहीये. त्यामुळे संघर्ष सुरुच राहावा आणि माझा संघर्षसुद्धा सुरुच आहे. मी स्टारडम कधीच गाठलं नाही. मी कोणी बडा स्टार कलाकार नाही हे मला माहितीये. मी आजही लोकांना कामासाठी भेटतो. स्वत: हून काम मागतो. त्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही," असं अजिंक्य देव म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "सांगण्याचं तात्पर्य हे की, इतका मोठा कलाकार असं म्हणतो; तेव्हा त्यांच्यासमोर मी तर कोणीच नाही. त्यामुळे संघर्ष सुरूच राहावा आणि माझा संघर्षसुद्धा सुरू आहेच. मी स्टारडम कधीच गाठलं नाही. माझ्यावरील प्रेमामुळे माझे मित्रपरिवार वा प्रेक्षक मला ‘स्टार’ म्हणत असतील; पण मी कोणी बडा स्टार कलाकार नाही हे मला ठाऊक आहे. मी आजही लोकांना कामासाठी भेटतो. स्वतःहून काम मागतो; त्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही."
दरम्यान,अजिंक्य देव यांनी या मुलाखतीमध्ये सिनेनिर्माते आणि फिल्ममेकर यांच्यात एकी नसल्याचं म्हटलं. इंडस्ट्रीमध्ये एकमेकांशी होणारा संवादच आज शून्य आहे. सॉरी टू से दिस..पण आपआपसातच कोणतंही कारण नसतांना स्पर्धा, चढाओढ सुरु आहे. आपलीच माणसं आपल्याला नंतर दुर्लक्षित करतात.