सध्या कलाविश्वात अनेक दिग्गज सेलिब्रिटी, क्रिडापटू, राजकीय व्यक्ती यांच्या जीवनावर आधारित सिनेमांची निर्मिती होत आहे. गेल्या काही काळात आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा कितीतरी प्रतिष्ठित राजकीय नेत्यांचा जीवनप्रवास त्यांच्या बायोपिक मधून उलगडला आहे. यामध्येच अभिनेता अक्षय वाघमारे यानेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अलिकडेच अक्षयने 'लोकमत फिल्मी'सोबत प्रश्नोत्तरांचा टास्क पूर्ण केला. यात कोणत्या राजकीय व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. सोबतच शरद पवार, अजित पवार, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे ऑप्शनही देण्यात आले होते. त्यावर त्याने राज ठाकरे साहेबांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असं सांगितलं.
दरम्यान, या प्रश्नासोबत कोणत्या खुर्चीवर बसायला आवडेल होम मिनिस्ट्री की एज्युकेशनल मिनिस्ट्री? असाही प्रश्न त्याला विचारला. त्यावर होम मिनिस्ट्री असं उत्तंर त्याने दिलं. इतकंच नाही तर त्याने राजकारणाशी निगडीत अनेक प्रश्नांची उत्तरही दिली. त्यामुळे सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.