अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरातल्या तरूणाईला अमेय वाघची ओळख झाली. पुढे फास्टर फेणे, मुरांबा यासारख्या त्याच्या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं आणि नंतर वेबसीरिजमधून त्याने हिंदी मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण केलं. अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या विनोदबुद्धीची साक्ष देणाऱ्या एक ना अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या मात्र सोशल मीडियावर वेगळाच ‘राडा’ पाहायला मिळतोय. होय, अमेय वाघ आणि सुमित राघवन (Sumeet Raghvan) या दोन अभिनेत्यांमध्ये सोश्ल मीडियावर चांगलीच जुंपली आहे. दोघांत कशावरून बिनसलं? काय झालं? हे कळायला मार्ग नाही. पण सध्या दोन्ही अभिनेत्यांच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगलीये.
काही तासांपूर्वी अमेय वाघने सुमित राघवनच्या नावाचा उल्लेख करत फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ‘जंगलात राघू (सुमित राघवन) खूप असतात, पण वाघ मात्र एकच असतो, कृपया नोंद घ्यावी,’ अशी पोस्ट अमेयने शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुमित राघवनला टॅगही केलं.
अमेयच्या या पोस्टवर सुमीत राघवनने लगेच रिअॅक्ट केलं. ‘सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय.... कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, याचीही कृपया नोंद घ्यावी,’असं उत्तर सुमीत राघवनने अमेयला दिलं. त्यानेही अमेयला टॅग केलं.यावर पुन्हा अमेय वाघ चिडला. त्याने आणखी एक डिवचणारी पोस्ट शेअर केली. ‘वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय,’असं त्याने लिहिलं. यावर सुमीत राघवन गप्प थोडीच बसणार? त्यानेही जशास तसे उत्तर दिलं.
‘अमेय वाघ घाबरून ठोकलेली ही आरोळी असते, डरकाळी नव्हे... आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे,’ असं उत्तर त्याने दिलं.
काय आहे प्रकरण, चाहतेही कन्फ्युज!अमेय वाघ व सुमीत राघवन यांच्यात नेमकं बिनसलं तरी काय? हे कळायला मार्ग नाहीच. पण दोघांच्या पोस्टने चाहते चांगलेच कन्फ्युज झाले आहेत. हे भांडण ‘रिअल’ आहे की ‘प्रमोशन’ यावरून नेटिजन्समध्ये चर्चा रंगली आहे. काही चाहत्यांच्या मते, हे नव्या सिनेमाचं प्रमोशन आहे. काहींनी मात्र यावरून दोन्ही कलाकारांना फटकारलं आहे. आपली धुणी आपपल्या घरात किंवा एकत्र धुवा रे. इथं तमाशे करून कलाकार म्हणून मिळणारा आदर गमावू नका, अशी कमेंट एका युजरने केली आहे. अम्या आणि सुम्या घरातल्या घरात भांडा, अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे.