Join us  

"ते लोक आता भोगत आहेत", घटस्फोटावर स्पष्टच बोलला अनिकेत विश्वासराव, पत्नीने केले होते हिंसाचाराचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:37 AM

अनिकेतने २०१८ साली अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्न करत संसार थाटला होता. पण, अवघ्या दोनच वर्षांत घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबीयांवर हिंसाचार आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. आयुष्यातील या कठीण काळाबाबत अनिकेतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

'ऊन पाऊस', 'कळत नकळत' अशा मालिकांमध्ये काम करून अभिनेता अनिकेत विश्वासरावने मराठी कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं. मालिकेत काम करून प्रसिद्धीझोतात आलेल्या अनिकेतने अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. पण, फिल्मी करिअरपेक्षा तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत होता. अनिकेतने २०१८ साली अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्न करत संसार थाटला होता. पण, अवघ्या दोनच वर्षांत घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबीयांवर हिंसाचार आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. तिने पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. आयुष्यातील या कठीण काळाबाबत अनिकेतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

अनिकेतने नुकतीच 'प्लॅनेट मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने घटस्फोटाबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, "सत्य काय आहे हे मला माहीत होतं. असं काही तरी झालं की हा दु:खी होणार, असं समाजातील लोकांना वाटतं. पण, मी दु:खी नव्हतो. मी लढत होतो. जर तुम्ही सत्यासाठी, जे योग्य आहे त्यासाठी लढत असाल. तर माणूस म्हणून तुमची प्रगती होत आहे. जर तुमचा देवावर आणि युनिव्हर्सवर विश्वास असेल. तर ती व्यक्ती आणखी खंबीर बनते. 'ऊन पाऊस' मालिकेपासून "अनिकेत संपला" हे मी ऐकतोय. हा एक प्रोजेक्ट करेल आणि गायब होईल, हे मी 'ऊन पाऊस'पासून ऐकत आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय याने मला फरक पडत नाही. आता तर अजूनच पडत नाही. या अशा काही घटनांमुळे आपली किंमत काय आहे? आपण किती खंबीर आहोत, हे जाणवतं. यामुळे आपल्यातला दडलेला माणूस, खरी पर्सनालिटी बाहेर येते". 

"लोकांना सांभाळून घेण्यात मी बरेच फटके खाल्लेले आहेत. यामुळे माणूस म्हणून माझी प्रगती झाली. पण, यामुळे चांगुलपणा किंवा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन मी बदलू दिला नाही. काही वाईट माणसांमुळे मी सगळ्यांना सारख्याच पारड्यात ठेवू शकत नाही. ज्यांनी हे सगळं केलंय ते आता भोगत आहेत. या गोष्टीचा मानसिक त्रास तर झाला. कारण, सगळ्या कायदेशीर गोष्टींमधून तुम्हाला जावं लागतं. पण, जे झालं त्याचा आनंद आहे. वकिलाच्या रुपात मला मित्र भेटला. आणि हायकोर्टानेही निर्णय दिला. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असं म्हणतात. पण, ज्याने कोणी हे म्हटलंय तो अतिशय वीक आणि फट्टू माणूस असेल. मी आताही सगळ्यांना सांगतो...कोर्टात जा, बिनधास्त जा...काहीही होत नाही. आपली न्यायव्यवस्था खूप चांगली आहे. त्यावर विश्वास ठेवा. न्याय मिळतो", असंही पुढे अनिकेत विश्वासराव म्हणाला. 

अनिकेतच्या पत्नीने अभिनेता आणि कुटुंबीयांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपही केले होते. तेव्हा पोटगी मिळवण्यासाठी स्नेहाने असे आरोप केल्याचं अनिकेतने म्हटलं होतं. दरम्यान, अनिकेत विश्वासराव डंका या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने 'फक्त लढ म्हणा', 'चोरीचा मामला', 'पोश्टर गर्ल', 'पोश्टर बॉईज', 'नो एण्ट्री', 'नटसम्राट' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :अनिकेत विश्वासरावमराठी अभिनेतासेलिब्रिटीघटस्फोट