मराठी सुपरस्टार अंकुश चौधरीने (ankush chaudhari) मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असणाऱ्या ‘छावा’ (chhaava movie) या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन केले. या शोला ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन, तरूण, विद्यार्थी अशा सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषेचा अभिमानास्पद ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारा हा विशेष कार्यक्रम होता. 'छावा' सिनेमाविषयी अंकुश चौधरीने दिलेली खास प्रतिक्रिया चर्चेत आहे.छावा पाहून अंकुश चौधरी काय म्हणाला?एका मुलाखतीत 'छावा' सिनेमाविषयी अंकुश म्हणाला की, "हा सिनेमा पाहणं एक वेगळा अनुभव आहे. मला खूप भरुन आलं आणि अंगावर काटा आला. जोरात ओरडून बोलावंसं वाटलं की जय भवानी जय शिवाजी. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी रडलो. मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. खूप वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने छावाच्या निमित्ताने आली. सगळ्या येणाऱ्या पिढीलाही हा इतिहास कायमस्वरुपी कळेल असं मला वाटतं."
या शोच्या आयोजनाबद्दल अंकुश चौधरी म्हणतो, ‘’या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असूच शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम हा महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. त्याचबरोबर या चित्रपटातील मराठी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या चित्रपटाच्या खास खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.या वेळी अंकुश चौधरीसह चित्रपटात ‘अंताजी’ची भूमिका साकारणारे आशिष पाथोडे, ‘धनाजी’ची भूमिका साकारणारे शुभंकर एकबोटे, पटकथा लेखक ओमकार महाजन, उन्मन बाणकर, शिवगर्जना प्रतिष्ठानचे तलवारबाजी प्रशिक्षक भार्गव शेलार, कला दिग्दर्शक बाळकृष्ण पाटील आणि रंगभूषाकार श्रीकांत देसाई उपस्थित होते.