देशभर कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याने इंडस्ट्रीचं टेन्शन वाढलं आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतही कोरोना दाखल झाला आहे. मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. अंकुशने खुद्द सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.
‘ नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोना वर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी,’असं ट्विट अंकुशने केलं आहे.
अंकुशने नुकतेच मराठी डान्सिंग रिअॅलिटी शोचा परीक्षक म्हणून काम पाहिलं. लवकरच त्याचा ‘लकडाऊन’ हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील दिसणार आहे. लॉकडाउनदरम्यान ठरलेलं लग्न करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात, याचं विनोदी चित्रण या चित्रपटात केलं गेलं आहे.
मराठीतील ‘सुना येती घरा’ या चित्रपटातून अंकुशने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. पुढे बॉलिवूडमध्येही त्याचा डेब्यू झाला. ‘जिस देश मे गंगा रेहेता है’ हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट. 2013 मध्ये ‘दुनियादारी’ या चित्रपटात त्याने साकारलेली दिगंबर शंकर पाटीलची भूमिका यादगार ठरली. आई शप्पथ, जत्रा, यांचा काही नेम नाही, रिंगा रिंगा, लालबाग परळ, यंदा कर्तव्य आहे, दगडी चाळ, ती सध्या काय करते अशा चित्रपटांतून अंकुशने सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडली.