'सैराट' (sairat) हा सिनेमा कोणताही मराठी प्रेक्षक विसरणार नाही. नागराज मंजुळे यांच्या या सिनेमाने अनेक रेकॉर्ड तोड प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. साधीसरळ पण तितकीच काळजाला भिडणारी कथा, नवखे पण तितकेच उत्तम कलाकार आणि कथा पडद्यावर सादर करायची पद्धत यांच्यामुळे हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाला. त्यामुळेच यातील कलाकारांना आजही तितकच प्रेम मिळतं. विशेष म्हणजे या सिनेमातील एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याचा स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.
सैराटमधील आर्च,परश्या यांच्या प्रेमाला साथ दिली ती सल्या आणि लंगड्या या दोन मित्रांनी. विशेष म्हणजे या चौघांची मैत्री आजही कायम आहे. त्यातीलच सल्याने म्हणजेच अभिनेता अरबाज शेख याने स्वत:चा नवा व्यवसाय सुरु केला आहे. अरबाजने त्याच्या या नव्या व्यवसायाची माहिती दिली असून रिंकू राजगुरूने सुद्धा व्हिडीओ पोस्ट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अरबाजने 'बेक बडीज' या नावाने स्वत:चं कॅफे सुरु केलं आहे. दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने त्याच्या नव्या कॅफेची माहिती दिली होती. त्यानंतर आता उद्या (११ फेब्रुवारी) या कॅफेचं उद्घाटन होणार आहे. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजसमोर, आंबेगाव बुद्रूक येथे अरबाजने त्याचं नवीन कॅफे सुरु केलं आहे. त्यामुळे सध्या अरबाजची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या व्यवसायाशिवाय अरबाज आजही कलाविश्वात सक्रीय आहे. सैराटनंतर तो, गस्त, झुंड, फ्री हिट दणका या सिनेमात तो झळकला आहे. त्यानंतर आता तो 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' या सिनेमात अरबाज झळकणार आहे.