Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडानंतर शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गट शक्तिप्रदर्शन करून सरकार स्थापनेच्या प्रयत्नात आहे. सत्तास्थापनेसाठी शिंदे गटाकडून हालचालींना वेग आला आहे. राज्यातील या राजकीय नाट्यावर सिनेसृष्टीतील कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) यात आघाडीवर आहे. आता त्याने नवं ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
काय म्हणाला आरोह?
‘राष्ट्रवादीचे ऐकून ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याच दिवशी धोक्याची घंटा वाजायला हवी होती. तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल पण ते म्हणतात ना, Straight trees are cut first, असा काहीसा गेम झालाय. तुमच्या लोकांचं ऐका साहेब, राष्ट्रवादीचे नको. ते कधीच कोणाचे नव्हते...- एक हिंदू,’असं पहिलं ट्वीट आरोहने केलं आहे.
दुसऱ्या ट्वीटमध्ये सुद्धा त्याने उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. ‘स्वत:च्या पायावर धोंडा मारून नंतर २.५ वर्षांनी पचतावण्यात काय अर्थ आहे? - अराजकीय’,अशा आशयाचं दुसरं ट्वीट त्याने केलं आहे.
याअधी त्याने एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिट्विट करत,‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असं म्हटलं होतं.
आरोह हा मराठी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता आहे. प्रायोगिक रंगभूमी, रेगे सारखा दर्जेदार चित्रपट, झी मराठी वरील ‘लाडाची मी लेक गं’मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’ अशी दजेर्दार कामगिरी त्याने केली आहे. आरोह अभिनेता असला तरी त्याने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलं आहे. नुकताच त्याचा ‘फनरल’ चित्रपट रिलीज झाला असून आरोहच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली आहे. आरोह हा आपल्या भूमिका तटस्थ पणे मांडणार एक निर्भीड अभिनेता आहे.