पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काल रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांना अटक केली. सुमारे 10 तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना आधी ताब्यात घेतलं आणि मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. संजय राऊतांना अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यभर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. अशात मराठी अभिनेता आरोह वेलणकर (Arohan Welankar) याचं ट्वीट व्हायरल होतंय.
राजकीय मुद्यांवर व्यक्त होणाऱ्या आरोहने संजय राऊतांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर एकट्वीट केलं आहे. ‘बाकी सगळं सोडा हो, पैसे खाल्ले का नाही ह्यावर बोला. भ्रष्टाचार केला का नाही ह्यावर बोला... काय?’असं ट्वीट आरोहने केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने संजय राऊतांचा उल्लेख केलेला नाही. पण राज्यातील सध्याची राजकीय घडामोड बघता, त्याचं ट्वीट संजय राऊतांना झालेल्या अटकेशी संबंधित असल्याचं मानलं जात आहे.
आरोहच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला पाठींबा दिला आहे तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. ‘बाकी सगळं सोड, पण तुझे चित्रपट का चालत नाही ह्यावर बोल,’अशा शब्दांत एका युजरने त्याला सुनावलं आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा, जिथे तुला ज्ञान नाही तिथे बोलण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळणार नाही, अशा शब्दांत एका युजरने त्याला फैलावर घेतलं आहे.याआधी शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं तेव्हाही आरोह वेलणकरने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर अशाच अनेक पोस्ट केल्या होत्या.
रेगे,घंटा या सिनेमांसाठी आरोह प्रसिद्ध आहे. ‘धर्मवीर’ या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘रेगे’ सिनेमात आरोहने प्रमुख भूमिका साकारली होती.