अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचे असंख्य चाहते आहेत. पन्नासच्या वर हिंदी चित्रपट, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक असा त्यांचा अफाट प्रवास आजही सुरू आहे. “एका माणसामुळे संपूर्ण इंडस्ट्री ओळखली जाते.. मराठी इंडस्ट्री म्हणजे अशोक मामा ज्याच्यात काम करतात ती इंडस्ट्री...”, असं सुबोध भावे त्यांची ओळख करून देताना अलीकडे म्हणाला होता, ते त्याचमुळे... अशोक सराफ यांच्याबद्दलचे एक ना अनेक किस्से तुम्ही वाचले असतील. त्यांच्या अंगठीचा किस्साही असाच. होय, गेल्या ४८ वर्षांपासून अशोक मामांनी आपल्या बोटातील ती अंगठी काढलेली नाहीये.
अशोक मामांच्या प्रत्येक चित्रपटात तुम्हाला ही अंगठी नक्की पाहायला मिळेल. अगदी एका चित्रपटात भिकाऱ्याची भूमिका साकारताना देखील त्यांनी आपल्या हातातील ती अंगठी काढली नव्हती. ही अंगठी त्यांना त्यांच्या एका मित्राने भेट दिली होती. एका मुलाखतीत अशोक सराफांनी या अंगठीबद्दलची आठवण सांगितली होती.
तर गोष्ट आहे १९७४ सालची. विजय लवेकर नावाचा अशोक सराफ यांचा एक मित्र होता. विजय लवेकर त्यावेळी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. शिवाय त्यांचं एक छोटंसं सोन्या चांदीचं दुकान देखील होत. एकदा विजय सेटवर आलेत आणि त्यांनी एक बॉक्स अशोक सराफ यांच्यापुढे ठेवला. त्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या अंगठ्या होत्या. एक अंगठी निवड, असं विजय अशोक सराफांना म्हणाले. अशोक सराफांनी एक अंगठी निवडली आणि लगेच बोटात घातली. त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरलेली होती. ही अंगठी बोटात घातल्यापासून बरोबर ३ दिवसातच अशोक मामांना पांडू हवालदार हा चित्रपट मिळाला. इतकंच नाही तर यानंतर एका पाठोपाठ एक चांगल्या भूमिका त्यांच्याकडे चालून आल्यात. अंगठी घातल्या घातल्या जणू अशोक सराफ यांचं नशीब बदललं होतं. झालं, तेव्हापासून ही अंगठी कधीच बोटातून काढायची नाही, असं अशोक सराफ यांनी ठरवून टाकलं. याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा, पण सराफांनी गेल्या ४८ वर्षांपासून एकदाही ही अंगठी बोटातून काढली नाही. एकदा भिकाऱ्याचा रोल होता. तेव्हा दिग्दर्शकांनी ही अंगठी त्यांना काढायला सांगितली. पण अशोक सराफ यांनी ठाम नकार दिला होता.