अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ही मराठी चित्रपट सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं. अशोक सराफ व निवेदिता यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. अशोक सराफ निवेदितांपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत. आश्चर्य वाटेल पण अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता अवघ्या सहा वर्षांच्या होत्या. अशोक व निवेदिता यांची लव्हस्टोरी इंटरेस्टिंग आहेच, तसेच या लव्हस्टोरीचे किस्सेही इंटरेस्टिंग आहेत. हा एक किस्साही असाच. ‘मी बहुरूपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांनी लग्नाआधीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
अशोक सराफ पुस्तकात लिहितात...मला आणि निवेदिताला लग्नानंतर वर्षभरातच अनिकेत झाला. ‘आमच्यासारखे आम्हीच’ या चित्रपटाचे डबिंग त्यावेळी सुरु होतं. ते सुरु असताना अनिकेतचा जन्म झाला. त्यामुळे या चित्रपटाचं डबिंग निवेदिताची यांची बहिण मीनलने केलं होतं.निवेदिता, त्यांची आई आणि बहिण यांचा आवाज अगदीच सारखा आहे. त्यामुळे अनेकदा गोंधळायला होतं. लग्नाच्या आधी मी एकदा निवेदिताला फोन केला होता. त्यावेळी अर्थात टेलिफोन होते. तेव्हा मी छान रोमँटिक बोलायला सुरुवात केली. त्यावेळी मध्येच समोरुन आवाज आला. “आहो, मी निवेदिताची आई बोलतेय, थांबा हा निवेदिताला बोलवते”, असं तिच्या आईने म्हटले. तिच्या आईचा हा आवाज ऐकल्यावर मी टेलिफोनसह खाली पडायचा बाकी होतो...
घरच्यांना मान्य नव्हतं लग्न...‘नवरी मिळेल नवऱ्याला’ सिनेमात अशोक सराफ व निवेदिता यांनी एकत्र काम केलं आणि याच सेटवर त्यांचं बहरलं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला खरा. पण लग्न निवेदिता यांच्या घरच्यांना मान्य नव्हतं. आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी निवेदिता यांच्या आईची इच्छा होती. परंतु निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर घरच्यांनी नमतं घेत दोघांच्याही लग्नाला संमती दिली.