मराठी कलाविश्वातील विनोदाचा बादशाह म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf). कधी नायक,कधी खलनायिक तर कधी विनोदी भूमिका साकारुन अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांच्या कित्येक भूमिका गाजल्या. त्यामुळे लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव कायम अग्रस्थानी आहे.विशेष म्हणजे आजही अशोक सराफ कुठे दिसून आले तर चाहते त्यांच्याभोवती गरडा घालतात. त्यांची एक झलक दिसावी यासाठी चाहते धडपड करतात. परंतु, एकदा त्यांच्या सोबत अशी घटना घडली होती ज्यामुळे त्यांना चक्क चेहरा लपवून प्रवास करावा लागला होता. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.
आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे पांडू हवालदार. या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. एकेकडे सिनेमा गाजत असताना दुसरीकडे अशोक सराफ यांना मात्र चक्क तोंड लपवून प्रवास करावा लागत होता.
अशोक मामांनी चेहरा लपवून का केला प्रवास
अशोक मामा यांचे सिनेमे जरी बॉक्स ऑफिसवर गाजत असले तरीदेखील त्याकाळी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे ते दुसऱ्या सिनेमाच्या शुटिंगसाठी रेल्वेने निघाले होते. यावेळी त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या सेकंड क्लास डब्याचं तिकीट काढलं होतं. या प्रवासादरम्यान दोन पोलिसांनी त्यांना बरोबर ओळखलं आणि त्यांची खिल्ली उडवली. तुम्ही मोठे कलाकार असूनही सेकंड क्लासने प्रवास करताय, असं म्हणत त्यांची मस्करी केली होती. त्यामुळे पुढील प्रवासात अन्य लोक पाहू नयेत आणि शरमेने मान खाली घालायला लागू नये यासाठी अशोक मामांनी संपूर्ण प्रवासात त्यांचा चेहरा पांघरुणाखाली झाकून ठेवला. दरम्यान, अशोक सराफ यांनी त्यांच्या बहुरुपी या पुस्तकातही या प्रसंगाचं वर्णन केलं आहे. तसंच कलाविश्वात त्यांना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांवरही भाष्य केलं आहे.