ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा 'अशी ही जमवाजमवी' सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. अभिनेत्री वंदना गुप्तेंसोबत त्यांची जोडी जमली आहे. उतारवयात नवीन जोडीदार मिळणं आणि त्याच्याशी लग्न करणं या विषयावर सिनेमा आधारित आहे. याला मस्त कॉमेडी टचही दिला आहे. दरम्यान नुकतंच अभिनेते अशोक सराफ यांनी आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं. हा निर्णय कसा घेतला यावर त्यांनी एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.
अशोक सराफ मराठीतील दिग्गज विनोदी अभिनेते आहे. आज वयाच्या ७७ व्या वर्षीही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु करण्याबाबतीत 'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "माझं इतके दिवस इन्स्टाग्राम वगैरे वर अकाऊंट नव्हतं. एक तर सोशल मीडियावर सर्वांना उत्तरं द्यावे लागतात. उत्तर दिलं नाही तर त्यांना वाटतं हा स्वत:ला फार शहाणा समजतो. म्हणून मी काही करत नव्हतो कारण माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता. पण नंतर वाटलं करुन बघायला काय हरकत आहे. अशी ही जमवाजमी सिनेमाच्या निमित्ताने मी इन्स्टाग्राम सुरु केलं. पण मला त्यातलं फारसं काही कळत नाही. लोकांनी काय काय केलंय ते मी बघत असतो. माझं अकाऊंट माझी टीमच सांभाळते."थोडी गोंडस, थोडी हळवी कहाणी; 'अशी ही जमवाजमवी'चा ट्रेलर रिलीज, अशोक सराफ-वंदना गुप्तेंची धमाल केमिस्ट्री
'अशी ही जमवाजमवी' सिनेमात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या अनुभवी कलाकारांसोबत सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. लोकेश गुप्ते यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. १० एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होत आहे.
अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्याआधी त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आले. १९६९ साली त्यांनी करिअरला सुरुवात केली. २५० पेक्षा जास्त मराठी सिनेमात त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या विनोदाच्या टायमिंगला तोडच नाही इतके त्यांनी विनोदी सिनेमे केले आहेत.