केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने अक्षरश: बॉक्स ऑफिस गाजवून सोडलं आहे. ५ बहिणींची कथा सांगणाऱ्या या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या तो बहुचर्चित आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हा सिनेमा पाहिला असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्येच अभिनेचा अशोक सराफ यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला. पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
काय म्हणाले अशोक सराफ?
"बाईपण काय भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील. पण, पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार नाही. पुरुषांचं भारी पण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कुणी गवगवा करत नाही कधी. स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना, दु:ख मैत्रिणींसमोर किंवा नवऱ्यासमोर व्यक्त करत असतात. पण, पुरुष मंडळी यावर कायम मौन बाळगून असतात. आपली दुःख, त्रास, आर्थिक संकटं ती कधीच कोणासमोर उलगडताना दिसत नाहीत आणि त्यावर कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातात," असं अशोक सराफ म्हणाले.
दरम्यान, अशोक सराफ यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चिलं जात असून स्त्रियांनाही त्यांचं म्हणणं पटलं आहे. अशोक सराफ यांनी दमदार अभिनयशैलीच्या जोरावर कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कलाविश्वात त्यांना प्रचंड मान आहे.