मराठी कलाविश्वातील राजामाणूस म्हणजे अशोक सराफ (ashok saraf). कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून ते लोकप्रिय आहेत. आजवरच्या कारकिर्दीत अशोक मामांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग सुद्धा तितकाच अफाट आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयीचे अनेक रंजक किस्से सध्या चर्चिले जात आहेत. यामध्येच अशोक मामा एका गंभीर अपघातातून थोडक्यात बचावल्याचा किस्सा सध्या चर्चिला जात आहे.
१९८७ साली अशोक सराफ यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामधून ते थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. अशोक सराफ यांनी त्यांच्या मी बहुरुपी या पुस्तकामध्ये या अपघाताचा उल्लेख केला आहे, सोबतच एका महिलेमुळे त्यांचे प्राण वाचले हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं.
अपघातातून थोडक्यात बचावले अशोक सराफ
पुण्यातलं शूटिंग संपल्यानंतर अशोक सराफ कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. सतत काम केल्यामुळे आलेल्या थकव्यामुळे त्यांना गाडीमध्येच झोप लागली. हा दिवस होता १७ एप्रिल १९८७ चा. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी खेड शिवापूरजवळ आली. त्यांच्या गाडीसमोर २ एसटी मागे-पुढे जात होता. परंतु, समोर एकच एसटी आहे असं समजून त्यांच्या ड्रायव्हरने त्या एसटीला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि तिच त्याची मोठी चूक झाली. समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकला त्यांची गाडी जोरात धडकली. या अपघातामध्ये अशोक सराफ यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. त्यात ड्रायव्हरचं जागीच निधन झालं.
या अपघातामुळे अशोक सराफ बेशुद्ध झाले जवळपास ३ दिवसांनंतर त्यांना शुद्ध आली त्यावेळी ते ICU मध्ये होते. अपघात झाल्यानंतर त्यांना तातडीने पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
महिलेमुळे वाचले अशोक सराफ यांचे प्राण
अशोक मामांचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. त्यावेळी कल्पना कौशल ही महिला तेथे डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आली होती. अपघात स्थळी गर्दी पाहून ती तिथे पोहोचली आणि तिने अशोक सराफ यांना ओळखलं. त्यानंतर तिने त्यांच्या जवळ असलेल्या सगळ्या वस्तूंची नोंद घेतली आणि पोलिसांनी संबंधित प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनीच पुणे गेस्ट हाऊसला फोन करुन अशोक सराफ यांचा अपघात झाल्याची माहिती सूर्यकांत मांढरे यांना दिली. त्यानंतर निर्माते अजय सरपोतदार यांनी पोलिसांचं काहीही न ऐकता अशोक मामांना संचेती रुग्णालयात दाखव केलं. ही सगळी माहिती अशोक मामांना त्यांच्या भावाने बरं झाल्यानंतर सांगितली.