Atul Kulkarni: मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni). अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आजवर वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'नटरंग', 'बम बम बोले', 'प्रेमाची गोष्ट','सिटी ऑफ ड्रीम्स', असे अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. अतुल कुलकर्णी त्यांच्या अभिनयासह अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतात. विविध मुद्यांवर ते स्पष्टपणे आपलं मत मांडतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अतुल कुलकर्णींनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केल्याची पाहायला मिळतेय. या पोस्टद्वारे त्यांनी स्वलिखित कविता 'लोक-मताची डुबकी' चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांची ही कविता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, एक्सअकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अतुल कुलकर्णी यांनी लिहिलंय की, "मतं गर्दी करतात, मतं डुबकी घेतात. लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात, लोक रडतात-भेकतात, लोक शांत होतात. पाच वर्षं सरतात, १२ वर्ष सरतात. परत, मतं गर्दी करतात, मतं डुबकी घेतात. लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात, लोक रडतात-भेकतात, लोक शांत होतात."
पुढे त्यांनी लिहिलंय, "मतं मनोरे रचतात, मतं जल्लोष करतात. लोक कोसळून पडतात, लोक घायाळ होतात, लोक रडतात, लोक भेकतात, लोक शांत होतात, पाच वर्षं सरतात, बारा महिने सरतात, परत लोक मतं मनोरे रचतात, मतं जल्लोष करतात. लोक कोसळून पडतात, लोक घायाळ होतात, लोक रडतात भेकतात, लोक शांत होतात, परत..., मतं रक्त सांडतात, लोक शांत राहतात, लोक भक्त असतात, लोक मतं बनतात, मतं आंधळी होतात, लोक ठेचा खातात. मतं रक्त सांडतात, लोक शांत राहतात, परत…", अशा आशयाची पोस्ट शेअर करत त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली आहे.