Join us

90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 1:21 PM

काही दिवसांपूर्वीच अतुल परचुरेंनी ९०च्या दशकातील एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. तीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली.

Atul Parchure Passed Away:  मराठी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं सोमवारी(१४ ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

अतुल परचुरे हे मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम नट होते. त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. ते सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसायचे. पण, तरीदेखील महत्वाच्या अपडेट्स ते चाहत्यांना द्यायचे. काही दिवसांपूर्वीच अतुल परचुरेंनी ९०च्या दशकातील एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. तीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. चिकलेट्सच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये अतुल परचुरेंसोबत दिवंगत अभिनेत्री विवेका बाबाजी आणि क्योंकी सास भी कभी बहु थी फेम आकाशदीप सहगल दिसत आहे. ही पोस्ट the90sindia या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये अतुल परचुरेंना टॅगही करण्यात आलं होतं. 

अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय 'आर के लक्ष्मण की दुनिया', 'जागो मोहन प्यारे' सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं.  त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा  'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. आता ते पुन्हा 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. आज त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

टॅग्स :अतुल परचुरेमराठी अभिनेताकर्करोग