मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेता म्हणजे भरत जाधव (bharat jadhav). आजवरच्या कारकिर्दीत भरत जाधवनेनाटक, मालिका, एकांकिका आणि सिनेमा अशा प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्यां पाहायला मिळतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून मोठा झालेल्या भरतने त्याच्या आयुष्यातील बरीच वर्ष मुंबईतील चाळीत काढली. त्यामुळे त्याच्याकडे चाळीतील आठवणींचा जणू खजानाच आहे. अलिकडेच भरतने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या चाळीतील काही मिल कामगारांच्या संपाविषयी भाष्य केलं.
भरत लवकरच 'अस्तित्व' या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रंगमंचावर वावरताना दिसणार आहे. हे नाटक मिल कामगारांच्या आयुष्यावर बेतलं आहे. या नाटकाच्या निमित्ताने त्याने अलिकडेच 'एबीपी माझा'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या चाळीतील काही मिल कामगारांची संपामध्ये झालेल्या वाताहतीवर भाष्य केलं आहे.
'लोकांना वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण...'; भरत जाधवने सांगितलं संपत्तीविषयीचं सत्य
"मिल कामगारांमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने दिवाळी कळाली. माझे वडील टॅक्सी चालवायचे. आणि, आम्ही ज्या चाळीत राहायचो त्या चाळीत बरेच मिल कामगार राहायचे. त्यांचा एक मुकादम होता ज्याला खूप मान असायचा. सगळ्यांच्या शिफ्ट लावणं वगैरे तो करायचा. दिवाळी आली की या सगळ्या मिल कामगारांना डबल बोनस मिळायचा. त्यामुळे त्याची दिवाळी खूप छान जायची. त्यांच्यामुळे आम्हाला दिवाळी कळायची खरं तर. आमच्याकडे काय रोज येणाऱ्या पैशांवर घर चालायचं. आज जर धंदा नसेल तर काय, त्यातही आमची आई तांदळाच्या डब्यात पैसे ठेवायची. थोडे थोडे पैसे साठवून मग दोन-एक महिन्यांनी आमच्याकडे मटण बनायचं", असं भरत जाधव म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "त्यांनी त्या परिस्थितीमध्येही आमच्या सगळ्या मुलांना सुसंस्कृत केलं, शिकवलं, चांगले संस्कार दिले. त्याच संस्कारांच्या जोरावर आज आम्ही इथे आहोत. त्यावेळी आमच्याकडे दिवाळी मोठी नसली तरी मिल वर्करची दिवाळी मजबूत असायची. पण, नंतर जो संप सुरु झाला, जी वाताहत झाली ते खूप त्रासदायक होतं. खूप हाल झाले. वडील, मुलांमध्ये भांडणं सुरु झाली. भावा-भावांमध्ये भांडणं सुरु झाली. सुरुवातीला संपाचा जो पहिल्या, चौथ्या,आठव्या दिवस उत्साह होता ना तो पन्नासाव्या दिवसानंतर भयानक होता. सगळ्यांच्या घरची परिस्थिती भयानक होती. मित्र आहेत आमचे सगळे. जमिनी विकल्या गावच्या. प्रत्येकाला आशा होती की आता चालू होईल. आता होणार आहे. पण नाही झाल्या."
दरम्यान, भरत जाधव लवकरच ते 'अस्तित्व' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हे नाटक मिल कामगारांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळेच या नाटकाविषयी बोलत असताना त्याने त्याच्या चाळीतील मिल कामगारांच्या आठवणींना उजाळा दिला.