मराठी कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या निखळ अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना हे कलाकार अचानकपणे इंडस्ट्रीपासून दूर झाले. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे भूषण कडू. आजवरच्या कारकिर्दीत भूषणने अनेक सिनेमा, मालिका, रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, करोना काळात तो इंडस्ट्रीपासून दूर गेला. इतकंच नाही तर तो सध्या काय करतो असाही प्रश्न चाहत्यांना पडतो.
'बिग बॉस मराठी १', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यांसारख्या कार्यक्रमातून भूषणने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. मात्र, २०२०-२१ मध्ये आलेल्या करोना महामारीच्या काळात त्याचं सगळ कुटूंब उद्धवस्त झालं. इतकंच नाही तर कुटुंबावर ओढावलेल्या संकटामुळे तो कलाविश्वापासूनही दूर गेला.
करोना काळात २९ मे २०२१ रोजी भूषणची पत्नी कादंबरी हिचं करोनामुळे निधन झालं. कादंबरीने वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पत्नीला अचानक गमावल्यामुळे भूषणला प्रचंड मोठा धक्का बसला. ज्यामुळे तो फिल्म इंडस्ट्री, सोशल मीडिया सगळ्यापासूनच दूर झाला.
भूषणला प्राकीर्थ हा लहान मुलगादेखील आहे. मात्र, आईचं छत्र हरपल्यानंतर भूषणने त्याच्या लेकावर मायेची सावली धरली. या काळात तो प्रसिद्धीझोतातून गायब झाला. त्याने अनेक प्रोजेक्ट्स सोडून दिले. त्याने सिनेमा, मालिका सगळ्यांच्या ऑफर्स रिजेक्ट केल्या. इतकंच नाही तर तो सोशल मीडियापासूनही दूर झाला.
पहिल्या पत्नीचंही झालं होतं निधन
कादंबरीपूर्वी भूषणचं पहिलं लग्न झालं होतं. मात्र, तिचंही काही कारणांमुळे निधन झालं. त्यात करोना काळात दुसऱ्या पत्नीलाही गमावल्यामुळे भूषण पुरता कोलमडून गेला.
सध्या काय करतोय भूषण?
पत्नीच्या निधनानंतर भूषण २०२२ मध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या एका पार्टीत दिसला. त्याला एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. त्यानंतर तो झी मराठीवरील हे तर काहीच नाही या कार्यक्रमातही गेस्ट म्हणून सहभागी झाला होता. सध्या भूषण रुपेरी पडद्यावर वावरत नसला तरी पडद्यामागे राहून तो लेखनाची जबाबदारी सांभाळत आहे. भूषण सध्या बालनाट्यांचं लेखन करताना दिसतोय. शिवाय तो अनेक अभिनय शिबिरांमधून नवोदित कलाकारांचं मार्गदर्शनही करतो.