फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ ( Sher Shivraj ) हा सिनेमा येत्या 22 एप्रिलला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटातही अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) छत्रपती शिवरायांची भूमिका जिवंत करणार आहे. याआधी फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तिन्ही चित्रपटात चिन्मयनेच महाराजांची भूमिका जिवंत केली होती आणि त्याने साकारलेल्या या भूमिकेचं प्रेक्षक, समीक्षक सर्वांनीच मनापासून कौतुक केलं होतं. आता चिन्मयची पत्नी नेहा जोशी (Neha Joshi Mandlekar) हिनेही नवऱ्याचं कौतुक केलंय. होय, नवऱ्याचं कौतुक करणारी एक गोड पोस्ट तिने शेअर केली आहे.
नेहाने चिन्मयचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत चिमुकला चिन्मय त्याच्या बाबाच्या मांडीवर बसलेला दिसतोय. या फोटोतील आणखी एक खास बाब म्हणजे, यात चिन्मय शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आहे. हाच बालशिवाजी आज मोठ्या पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारतोय. याबद्दल नेहानं लिहिलं आहे. ‘बाबांना बहुतेक तेव्हाच समजलं असावं .. आज जिथे असतील तिथून आई - बाबांना तुझा फक्तं आणि फक्तं अभिमानंच वाटत असेल. त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही,’असं नेहाने तिच्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे.नेहाच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अगदी खरंय, आम्हाला चिन्मयचा अभिमान आहे, अशा आशयाच्या अनेक पोस्ट चाहत्यांनी शेअर केल्या आहेत.
चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा जोशी ही फारसी प्रकाशझोतात नसते. ती फोटोग्राफर असून ती वाइल्ड फोटोग्राफी करते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय आहे. चिन्मय सोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती वेळोवेळी शेअर करत असते. नेहाने मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री नेहा जोशी हिचं फोटोशूट केलं होतं आणि या फोटोशूटची सर्वत्र खूप चर्चा झाली होती.