Join us

इन्फ्लुएन्सर्सला 'अ‍ॅक्टर्स' म्हणण्याविषयी प्रसाद ओकचं बेधडक वक्तव्य, म्हणाला, 'अत्यंत थर्डक्लास क्राइटेरिया …'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 1:35 PM

Prasad oak: सध्या अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मालिका, सिनेमांमध्ये काम करताना दिसत आहेत. यात त्यांच्या निवडीबाबत प्रसादने त्याचं मत मांडलं आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे आज सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळ्या कंटेन्टचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. विशेष म्हणजे सोशल मीडियावर आज अनेक इन्फ्युएन्सर्स पाहायला मिळतात. यात काही असेही इन्फ्युएन्सर आहेत ज्यांना केवळ जास्त फॉलोअर्सच्या आधारावर चक्क मालिका, सिनेमांमध्ये काम मिळालं आहे. त्यामुळेच फॉलोअर्सच्या आधारावर कलाविश्वात काम मिळवणाऱ्या इन्फ्युएन्सरविषयी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याने बेधडक व्यक्तव्य केलं आहे.

अलिकडेच प्रसाद ओकने 'कॉकटेल स्टुडिओ'च्या 'इनसाइडर्स' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्सला अॅक्टर्स म्हणण्यावर त्याची प्रतिक्रिया दिली. मुळात हा क्राइटेरिया ज्यांनी सुरु केला त्यांच्यावरही त्याने ताशेरे ओढले आहेत.

नेमकं काय म्हणाला प्रसाद?

 “दुर्दैवी आहे. अत्यंत थर्ड क्लास क्राइटेरिया आहे हा की, ज्यांचे फॉलोअर्स जास्त तो चांगला किंवा मोठा अ‍ॅक्टर्स. हा हिंदीवाल्यांनी आणलेला ट्रेंड आहे, जो मराठीत रुजू पाहतोय. पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच. जोपर्यंत मराठीमध्ये परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, मी स्वतः, रवी जाधव, विजू माने, अभिजीत पानसे.. अशी अनेक नावं घेता येतील माझ्या सहकारी मित्रांची, जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत. तोपर्यंत फॉलोअर्सच्या कॅटगिरीचा मराठीत काही फार फरक पडेल किंवा त्याने काही खूप मोठा बदल होईल असं मला तरी वाटतं नाही, असं प्रसाद म्हणाला.

राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';

पुढे तो म्हणतो,  "हिंदीवाले ते करतायत. पण अखेर तो अ‍ॅक्टर्स म्हणून कसा आहे हे कळल्यानंतर ते स्वतः त्याला अनफॉलो करत असतील असं मला वाटतंय." दरम्यान, प्रसाद लवकरच ‘महापरिनिर्वाण’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाशिवाय तो ‘गुलकंद’, ‘धर्मवीर २’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘वडापाव’ या सिनेमांमध्येही दिसणार आहे.

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडसोशल मीडिया