'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता एकनाथ गीते याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकनाथच्या धाकट्या भावाने आत्महत्या करत त्याचं आयुष्य संपवलं आहे. भावाच्या मृत्यूनंतर त्याने भावूक करणारी पोस्ट शेअर केली आहे. इतकंच नाही तर हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी का बोलला नाहीस, असं म्हणत त्याने खंतही व्यक्त केली आहे.
"एक आठवडा झाला तुला जाऊन आज अजूनही खरं वाटत नाहीये…हे वाईट स्वप्न संपून जाग का येत नाहीये मला? असंच वाटतंय सतत…आयुष्यभराची हुरहूर लावून गेलास रे मनाला. खूप सारे प्रश्न सोडून गेलास, कुठे शोधू मी उत्तरं? आणि उत्तरं मिळाली, तरी तू नाहीस न दिसणार परत कधीच, कुठेच….. फक्त भाऊ नव्हतो ना आपण मित्र पण होतो ना रे. का नाही व्यक्त झालास माझ्याजवळ यावेळेस? आत्महत्या पर्याय कसा असू शकतो रे विजु? कसं जगायचं आम्ही आता तुझ्याशिवाय बाळा ???”..अशी भावूक करणारी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
दरम्यान, एकनाथ गीते हा मुळचा परभणीचा असून जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे त्यांचं गाव. अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी त्याने परभणीहून मुंबई गाठली. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने मास्टर्स ऑफ थिएटर आर्टस् केले. विशेष म्हणजे अल्पावधील तो लोकप्रिय झाला. एकनाथने देवमाणूस, हृदयी प्रीत जागते, गेट टू गेदर, घेतला वसा टाकू नको, अशा गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.