Sumeit Chavan emotion post : युट्यूबर ते अभिनेता असा प्रवास करणारा सुमित चव्हाण (Sumeit Chavan) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच सुमितच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर सुमितने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘बापमाणुस गेला..,’ अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुमितची पोस्ट
बाप माणुस गेला.. दु:खापासून खूप लांब, आनंदात लपून बसलो होतो, अचानक दु:ख येतं आणि तुम्हाला धप्पा देतं, तुम्ही आउट होता. २००१ मध्ये बाबांची मिल बंद झाली, मुलाचं शिक्षण मुंबईतच झालं पाहिजे, म्हणून ते मुंबईत थांबले, रिक्षा चालवून आमचं शिक्षण पूर्ण केलं. शाळा, कॉलेज आणि परवा पर्यंत शूटसाठी मला त्याच रिक्षातून सोडत होते, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करत होतो, पण काही स्वप्न राहून गेली, गेले २१ वर्ष रिक्षा चालवली, आपल्या स्वत:च्या कारमध्ये बसून फिरवायच होतं, गावाला मोठा बंगला बांधायचा होता, बहिणीचं लग्न करून द्यायचं होतं, मला मोठया पडद्यावर बघायचं होत. पण मी हे सगळं नाही करू शकलो पूर्ण, मला उशीर झाला, आयुष्यभर ह्या गोष्टी मनाला टोचत राहतील....
काय पण साला नशीब आहे, ज्या दिवशी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली, त्याच दिवशी बाबांनी एक्झिट घेतली, एवढी वर्ष रिक्षा चालवली आणि रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला. बाबा तुम्ही आता स्टार झालात, वरून बघत रहा, मी सगळी स्वप्न पूर्ण करेन, काळजी नका करू. ते कट्टर शिवसैनिक होते, त्यांना आपल्या आजूबाजूला गर्दी करायला आवडत होती, रात्री अचानक गेले तरी त्याच्यासाठी गर्दी झाली, ही त्यांनी कमावलेली माणसं होती. मी खूप प्रेम करतो तुमच्यावर.. हे एकदा तुम्हाला बोलायचं होतं, बाबा आपण पुन्हा भेटू, गप्पा मारू, तोपर्यंत आईची बहिणीची मी काळजी घेईन, राहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची ताकद मला माझ्या जवळच्या मित्रांनी दिलीय. तुम्ही खूप धावपळ केली आता आराम करा...., अशी भावुक पोस्ट सुमितने लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होतेय.
सुमित चव्हाणने युट्युबर म्हणून सुरूवात केली. त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुमित चव्हाणने सर्वांना खळखळून हसवताना दिसतो. फेक रे न्यूज, ही चाळ तुरु तुरु, छोटी खोटी लव्ह स्टोरी अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुमित चव्हाणने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.