'छावा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई लेझीम खेळतानाचं दृश्य दाखवल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमातील हे दृश्य काढून टाकण्याचा निर्णय घेतला. याच विषयावर अभिनेता गश्मीर महाजनीने त्याचं मत मांडलंय. गश्मीर महाजनीने 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. अखेर या मुद्द्यावर गश्मीरने त्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
गश्मीरने लोकसत्ताशी संवाद साधताना 'छावा'च्या वादाबद्दल त्याचं मत मांडलं की, "मी छत्रपती संभाजी महाराजांची जी भूमिका केली त्यावेळी कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी नाही झाली. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की, एकाच व्यक्तीने एकाच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असा डबल रोल करणं ही फार मोठी रिस्क होती. तरीसुद्धा सर्वांनी मोठ्या मनाने हे स्वीकारलं आणि एकही बोट उचललं गेलं नाही. त्यामुळे माझा ही भूमिका करण्याचा अनुभव खूप छान होता."
"त्यामुळे मी पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांवर नक्की सिनेमा करेन. आणि हा सिनेमा मराठीतच करणार. कारण मराठीतच हा सिनेमा भव्यदिव्य झाला पाहिजे. त्या भाषेचं एक सौंदर्य असतं. म्हणजे हा सिनेमा दुसऱ्या भाषेतही व्हावा यात काहीच वाद नाही. कारण जो जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल. पण हा सिनेमा विथ सबटायटल मराठी भाषेतही झाला पाहिजे कारण ती महाराजांची भाषा होती."
"जसं सहादत हसन मंटो तुम्ही मराठीत वाचलात तर त्याची ती मजा येत नाही जशी ती हिंदी-उर्दू भाषेत वाचायला येते. विजय तेंडुलकर हिंदीमध्ये वाचलात तर मजा येणार नाही कारण ती भाषेची गंमत होती. पु.ल. देशपांडेचं साहित्यही मराठीत वाचण्यात वेगळी मजा आहे. तसं मला भविष्यात छत्रपती संभाजी महाराजांवर एक मराठी सिनेमा हा १०० टक्के करायचाच आहे. जो मराठीमध्ये भव्यदिव्य असेल. पण त्याची वेळ अजून यायचीय. कदाचित ४-५ वर्ष लागतील त्याला. मला इतक्या मोठ्या मनाने सर्वांनी स्वीकारलंय तर पुढे जाऊन चित्रपट करायला मला कशाचीही भिती नाही."