जालना जिल्ह्यालीत आंतरवाली येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. तसेच या कारवाईमुळे पोलीस, गृह मंत्रालय आणि राज्य सरकारविरोधातही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याने ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) ट्वीट करत जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा निषेध केला आहे. तो लिहितो, 'जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी! आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी…राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!'
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली येथे आंदोलन आणि उपोषण करत असलेल्या आंदोलकांना शुक्रवार १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. हा लाठीमार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याच आदेशावरून झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. तसेच या प्रकरणी कारवाईची मागणीही होत होती. अखेर आज तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.