अभिनेता ते यशस्वी दिग्दर्शक असा प्रवास करणारा मराठीमोळा सेलिब्रिटी म्हणजे हेमंत ढोमे (Hemant Dhome). आपल्या हसतमुख स्वभावामुळे प्रेक्षकांना आपलंस करणारा हेमंत आज मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. अलिकडेच त्याचा झिम्मा हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यानंतर लवकरच त्याचा डेट भेट हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या पहिल्या डेटविषयी भाष्य केलं.
अलिकडेच हेमंतने 'मॅजिक एफएम'च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.यावेळी त्याने त्याच्या पहिल्या डेटविषयी भाष्य केलं. पहिल्यांदाच डेटवर गेल्यानंतर मी तिच्यासमोर खूप रडलो होतो, असं त्याने सांगितलं.
"मी युकेला मास्टर्स करत असताना माझ्यासमोर एक ४५ ते ५० वर्षांची बाई रहायची. मी माझ्या मित्रांना जी-मेल चॅटवरुन ती खूप सुंदर दिसते वगैरे सांगितलं होतं. मी त्यावेळी फक्त १९-२० वर्षांचा होता. ख्रिसमसच्या संध्याकाळी त्या बाईने मला तिच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. तुला आज माझ्या घरी जेवायला यायला जमेल का? असं तिने विचारलं. आणि, मी सुद्धा होकार कळवला. त्यांच्या घरी जायचं म्हणून मी एक वाईनची बाटली आणि त्यांच्याकडे जेवायला गेलो",असं हेमंत म्हणाला.
पुढे तो म्हणतो,"त्यांच्या घरी गेल्यावर आम्ही दोघं जेवलो. खूप गप्पा मारल्या. आणि बोलता बोलता त्यांनी त्यांच्या मुलाविषयी मला सांगितलं. माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला असतो. तो अगदी तुझ्याच वयाचा आहे. मला त्याची खूप आठवण येते. तू सुद्धा तुझ्या घरच्यांपासून दूर आहेस म्हणून मी तुला जेवायला बोलावून घेतलं. त्यांचं हे बोलणं ऐकून मी खूप ढसाढसा रडलो. त्यांनी माझं सांत्वन केलं आणि मी माझ्या घरी आलो. दुसऱ्या दिवशी उठल्यावर मला जाणवलं. शेवटी आई ती आईच असते. मग ती भारतातली असो किंवा इंग्लंडची. त्या दिवसापासून माझा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यानंतर मी कोणत्याच स्त्रीबद्दल कधीच कसलं मत बनवलं नाही. त्यामुळे या डेटवर आलेला अनुभव खूप वेगळा आणि आयुष्यभर पुरेल असा होता."
दरम्यान, हेमंत ढोमे याने मराठी सिनेमांसह नाटकांमध्येही काम केलं आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्याने अभिनयापासून फारकत घेतली आहे. तो सिनेमाच्या दिग्दर्शनात जास्त रमतांना दिसत आहे. गेल्या काही काळात त्याचे 'झिम्मा', 'सनी', 'सातारचा सलमान' हे लागोपाठ चित्रपट आले आहेत.