हृषिकेश जोशी हे अभिनेता असण्याबरोबरच उत्तम दिग्दर्शक आणि लेखकही आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याबरोबरच त्यांनी बॉलिवूडमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतलेल्या हृषिकेश जोशींनी अनेक हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एका हिंदी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला.
चित्रपट समीक्षक सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' पॉडकास्टला हृषिकेश जोशींनी हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी हिंदी सिनेमाचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "भावेश जोशी या विक्रमादित्य मोटवानी यांच्या सिनेमातून हर्षवर्धन कपूरने पदार्पण केलं. त्यात मी सहाय्यक भूमिका साकारत होतो. त्यावेळी मी विकता का उत्तर या शोचं लेखन करत होतो. त्या शोच्या शेवटी मी एक कॅरेक्टर बनून यायचो. ५२ एपिसोड मी त्यात वेगळी ५२ पात्र केली होती.त्यामुळे मला शूटिंगलाही उपस्थित राहणं गरजेचं असायचं. त्यावेळी या सिनेमाच्या तारखा नेमक्या फसल्या."
"फेमस स्टुडिओला मी दिवसभर विकता का उत्तरचं शूट करून कॅबने भांडूपच्या स्टुडिओला जायचो आणि नाईट शिफ्ट करायचो. सकाळी सायनला माझ्या मामेबहिणेकडे अंघोळ करुन परत नऊच्या शिफ्टला फेमस स्टुडिओला असायचो. असं मी सलग ७२ तास शूट केलं. रात्रीच्या शूटला सगळे अक्शन सीक्वेन्स होते. पहिल्या सीक्वेन्समध्ये तो मला भींतीवर ढकलतो. मागे वळतो आणि बॅगेतून स्प्रे काढून माझ्या डोळ्यात मारतो. पहिल्या टेकला तो स्प्रे त्याच्याच डोळ्यात गेला. दुसऱ्या टेकमध्ये तो भलत्याच दिशेला गेला. त्यानंतर शेवटी दिग्दर्शकाने फक्त हाताचा शॉट घेतला," असं त्यांनी सांगितलं.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या जीवावर बेतलं असतं. ते म्हणाले, "त्यानंतर मला लाकडी खूर्चीला बांधून ठेवून माझ्या गुडघ्यावर पक्कड मारायची असा सीन होता. हात बांधलेत, तोंडाला पट्टी बांधलीये...मला पॅडिंग पण लावलेली होती...तरी त्याने पॅडिंगच्या वरच मारलं...मारल्यावर मी इतका कळवळलो...तर दिग्दर्शकाला वाटलं की एनएसडीचा अभिनेता. कधी एकदा पहाट होतेय असं मला झालं होतं. त्यानंतर एका सीनमध्ये मी मेलो असतो. शेवटी मी म्हटलं इनफ..."