मराठीसह हिंद आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणजे जयवंत वाडकर (jaywant wadkar). अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये झळकलेले जयवंत वाडकर चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असतात. परंतु, गेल्या काही काळापासून त्यांच्यासोबत त्यांच्या लेकीचीदेखील चर्चा रंगू लागली आहे. अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केल्यामुळे जयवंत वाडकरांची लेक स्वामिनी (swamini wadkar) सोशल मीडियावर चर्चेत असते. विशेष म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वामिनीनेदेखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मात्र, तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामध्येच स्वामिनीला छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय मालिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी तिने या मालिकेसाठी नकार दिल्याचं सांगण्यात येतं.
महेश मांजरेकरांच्या 'एफ यू' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या स्वामिनीला 'रंग माझा वेगळा' या मालिकेची ऑफर मिळाली होती. मात्र, तिने ही मालिका नाकारली. तिच्या नकारानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी अभिनेत्री रेश्मा शिंदेला ही मालिका ऑफर केली. त्यामुळे आज रंग माझा वेगळामध्ये रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
ज्यावेळी स्वामिनीला 'रंग माझा वेगळा' या मालिकेसाठी विचारणा करण्यात आली. त्यावेळी स्वामिनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. त्यामुळेच एकाच वेळी कॉलेज आणि मालिका एकत्रपणे करणं स्वामिनीला शक्य नव्हतं. या दोघांपैकी तिला एकाची निवड करायची होती. त्यामुळे तिने शिक्षणाची निवड केली. त्यामुळेच स्वामिनीने ही मालिका नाकारल्याचं सांगण्यात येतं.
दरम्यान, 'एफ यू' चित्रपटानंतर स्वामिनीने 'ये है आशिका' या चित्रपटात काम केलं आहे. सध्या स्वामिनी सोशल मीडियावर सक्रीय असून मराठी कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकिड्समध्ये तिचं नाव घेतलं जातं.
कोण आहेत जयवंत वाडकर?
जयवंत वाडकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.१९८८ साली त्यांनी 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर मराठीत त्यांनी १९८८ साली 'एक गाडी बाकी अनाडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत एण्ट्री केली. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरही त्यांनी भरपूर काम केले आहे. जयवंत वाडकर यांना स्वामिनीशिवाय एक मुलगादेखील आहे. तन्मय वाडकर असं त्यांच्या मुलाचं नाव आहे.