Join us

नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 9:43 PM

नाटकाचं काम सुरु होतं, जयवंत वाडकर यांनी शेअर केलेल्या त्या फोटोत कोण कोण?

अतुल परचुरे (Atul Parchure) मराठीतील हरहुन्नरी अभिनेता. आज त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी कॅन्सरवर मात करुन त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी आजाराने डोकं वर काढलं. त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज त्यांच्या निधनाचीच बातमी आल्याने कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे जवळचे मित्र ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी सोशल मीडियावरअतुल परचुरेंसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट केला आहे.

जयवंत वाडकर आणि अतुल परचुरे हे जुने मित्र होते. नाटकांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. आयुष्याच्या या टप्प्यावरही ते एकमेकांसोबत उभे होते. अतुल परचुरेंच्या निधनाने त्यांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच ते अतुल परचुरेंबरोबर एका नाटकाचं काम करत होते. मित्राबरोबरचा शेवटचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये अतुल परचुरेंसोबत आनंद इंगळे, संजय मोने हे देखील दिसत आहेत. त्यांनी लिहिले, 'अतुल अरे आत्ता तर भेटलो होतो आपण...'

'एबीपी माझा'ला दिलेल्या प्रतिक्रियेत जयवंत वाडकर भावूक होत म्हणाले, "काय बोलू. शब्दच नाहीयेत. 'सूर्याची पिल्ले' ची रिहर्सल सुरु होती. मात्र पाच दिवसांपूर्वी त्याला त्रास व्हायला लागल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. नंतर सुनिल बर्वेने ते काम केलं. पण असं वाटलं होतं की तो परत येईल. सुंदर अभिनेता. माझ्याबरोबर तो नववीत असल्यापासून काम करत होता. टिळक आणि आगरकर नाटकात आम्ही पहिल्यांदा काम केलं. तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. उत्कृ्ष्ट नट होता, खूप लवकर गेला आमचा मित्र."

अतुल परचुरेंना पुन्हा रंगभूमीवर पाहण्याच्या आधीच ते जग सोडून गेले. त्यांचं निधन हे कुटुंबियांना, कलाकारांना, मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना चटका लावणारं आहे. 

टॅग्स :जयवंत वाडकरअतुल परचुरेमराठी अभिनेतासोशल मीडिया