जितेंद्र जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या कित्येक वर्ष तो प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. अनेक मराठी चित्रपटांत काम करून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. जितेंद्र सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती देत असतो. त्याबरोबरच समाजातील अनेक घडामोंडीबाबत जितेंद्र त्याच मत अगदी परखडपणे मांडताना दिसतो.
सध्या जितेंद्रच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जितेंद्रने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. शहरीकरण आणि मानवी विकासासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होण्याबाबत त्याने यातून भाष्य केलं आहे. "महामार्ग निर्माण करताना झाडांची कत्तल करणाऱ्या लोकांना आपल्या पुढच्या पिढ्या गुदरमताना दिसत नाहीत. झाडांची अमानुष हत्या होऊ देणारे आपणसुद्धा निर्वंश होऊन मारून टाकले जाणार आहोत. आत्ताच आपापल्यासाठी डांबर तयार ठेवू त्याच रस्त्यांखाली झाडांच्या मृतदेहासोबत झोपी जाण्यासाठी," असं जितेंद्र जोशीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जितेंद्रने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'गोदावरी', 'चोरीचा मामला', 'काकण', 'तुकाराम', 'बघतोस काय मुजरा कर', 'कुटुंब' या सिनेमांत तो विविधांगी भूमिका साकारताना दिसल्या. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'नाळ २' सिनेमात जितेंद्र दिसला होता.