कलाकार स्क्रीनवर चांगलं आणि फिट दिसण्यासाठी स्वतःच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असतात. त्यासाठी ते व्यायाम आणि डाएटचा आधार घेतात. कधी कधी कलाकार त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना थक्क करतात. असंच काहीसे मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकाराच्या बाबतीत घडले आहे. त्याने ५ महिन्यात २४ किलो वजन घटवून सर्वांना थक्क केले आहे. हा अभिनेता म्हणजे चूक भूल द्यावी घ्यावीमधला बालपणीचा टेण्या भाऊजी उर्फ अभिनेता विहंग भणगे (Vihang Bhanage). त्याने रात्रीचे जेवण वर्ज्य केले आहे. आज या गोष्टीला जवळपास १० वर्षे पूर्ण होत असल्याची त्याने एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
विहंग भणगे याने बालकलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. त्याने देवकी या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. तो बालपणापासूनच खूपच हेल्दी होता. त्यामुळे मोठेपणीही त्याचे शरीर वाढतच जात होते. पण आपल्याला जर कलाकार म्हणून इंडस्ट्रीत ओळख बनवायची असेल तर आपल्या खण्यापिण्यावर आपलं नियंत्रण हवं या विचाराने तो पेटून उठला. वाढलेल्या शरीरावर नियंत्रण मिळवायचं असेल तर रात्रीचं जेवण करायचं नाही असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. बघता बघता त्याला या गोष्टीचा चांगला परिणाम जाणवू लागला. ही आठवण सांगताना विहंगने त्याचे पूर्वीचे काही फोटो आणि आताचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
याबद्दल विहंग भणगे म्हणतो की, “आज १० वर्षे झाली मी रात्री जेवत नाही. तसा त्रास काहीच होत नव्हता, पण बारीक होण्याची नितांत गरज होती. मग ठरवलं आजपासून खाण्यावर संयम ठेवूया. डाएट करूया. संतुलित आणि मर्यादित आहार घेऊया. तेव्हापासून अनेक आवडीच्या पदार्थांना रामराम ठोकला तो आजतागायत. केवळ ५ महिन्यांत २४ किलो वजन तज्ज्ञांच्या सल्ल्याने कमी केळे. बारीक झालो नसतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाली नसती. ना टेण्या भाऊजी मिळाले असते, ना बॉईजमधल्या दहावीतल्या मुलाची भूमिका, ना इतर कोणती पात्र.” विहंग भणगेचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत आणि ते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.