मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे (makarand asanpure). कधी विनोदी तर कभी गंभीर भूमिका साकारुन त्यांनी विविध माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. इतकंच नाही तर अभिनयासह त्यांनी सामाजिक भानही जपलं. त्यामुळेच नाम फाऊंडेशनच्या मदतीने ते कायम सामान्यांपर्यंत पोहोचत असतात. म्हणूनच, सोशल मीडियावर त्यांची या ना त्या कारणाने चर्चा रंगत असते. परंतु, असं असूनही ते स्वत: मात्र सोशल मीडियावर अजिबात सक्रीय नाहीत. या मागचं कारण त्यांनी नुकतंच दिलं आहे.
अलिकडेच मकरंद अनासपुरे यांनी 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सोशल मीडियापासून दूर असण्यामागचं कारण सांगितलं.
"मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या कामामधून लोकांनी स्वीकारावं. तुम्ही जर तुमच्या कामाला पुरेसा वेळ दिला नाही तर तुम्ही काम कसं चांगलं करणार? सतत तुम्ही मोबाईलमध्ये स्वत:विषयीचं बोलत राहिलात. जसं की, आज मी शिवाजी पार्कमध्ये आहे, इथे बसलोय, इथे पडलोय तर माझ्या दृष्टीने याच्यात काही अर्थ नाहीये. कारण, प्रत्येकाने त्याच्या आयुष्यतली प्रायव्हसी जपली पाहिजे आणि आपल्या कामातून प्रेक्षकांशी जोडलं गेलं पाहिजे", असं मकरंद अनासपुरे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, " माझ्या घरी पुऱ्या कशा करतात नी चकल्या कशा करतात हे सांगायचं. यात काय कोणाला स्वारस्य असू शकतं का?. असेलही पण मला तसं काही वाटत नाही. मी सिनेमाच्या भाषेतून प्रेक्षकांशी कनेक्टेड आहे. आणि मला वाटतं ती जास्त महत्त्वाची गोष्ट आहे."