मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ गेली कित्येक दशकं त्यांच्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीही त्यांनी गाजवली. विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अशोक सराफ यांनी अनेकांना त्यांच्या कठीण काळात मदत केली. असाच एक प्रसंग सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शेअर केला होता.
नाना पाटेकर यांच्या कठीण काळात अशोक सराफ यांनी त्यांना मदत केली होती. एका कार्यक्रमात त्यांनी हा प्रसंग सांगितला होता. 'फिलमवाला' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नाना पाटेकरांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "अशोकने मला वारंवार पैशाची मदत केली आहे. 'हमीदाबाईची कोठी' नावाचं नाटक आम्ही करत होतो. त्यावेळी अशोकला २५० रपये तर मला ५० रुपये मिळायचे. मधल्या वेळेत नाटक नसताना आम्ही पत्ते खेळायचो. तेव्हा अशोक नेहमी ५-१० रुपये हरायचा. तो मुद्दाम करायचा हे मला माहीत असायचं, पण पैशाची गरज असल्यामुळे मीही ते पैसे घ्यायचो", असं नाना पाटेकर म्हणाले.
"एवढी दुनियादारी बघितलेला माणूस...", संजय जाधव यांच्यासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट
नाना पाटेकरांनी गणेशोत्सवाचीही एक आठवण सांगितली. ते म्हणाले, "एकदा गणपतीसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. सकाळी ६ वाजता फिल्म सिटीला शूटिंगला जात असताना तो माझ्या माटुंग्याच्या घरी आला. त्याने कोरा चेक माझ्याकडे दिला. अकाऊंटमध्ये १५ हजार आहेत, तुला पाहिजे तेवढे घे, असं मला म्हणाला. तेव्हा मी तीन हजार काढले होते. त्याने माझ्याकडे कधीच पैसे मागितले नाहीत. काही वर्षांनंतर 'सावित्री' या सिनेमाच्या शूटिंगवेळी मी त्याला ते पैसे दिले. तेव्हा तो मला 'काय पाटेकर...तुम्ही पैसेवाले झाले' असं म्हणाला होता. त्यावर मी त्याला "पैसेच परत करतोय, वेळ नाही परत करू शकत" असं म्हणालो होतो."
"नाटकाच्या दौऱ्यात आम्ही अशोकचे पाय दाबायचो. त्याच्या डोक्याला तेल लावून द्यायचो. तो आम्हाला त्याचे पाच रुपये द्यायचा. आजही अशोक भेटला की मी त्याचे पाय दाबतो,"असंही नाना पाटेकरांनी सांगितलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.