हा मराठी अभिनेता आता चित्रपटानंतर करणार नाटकाचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 11:00 AM
ढाई अक्षर प्रेम के हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. व.पु.काळे यांच्या कादंबरीवर आधारित हे नाटक असणार असून ...
ढाई अक्षर प्रेम के हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. व.पु.काळे यांच्या कादंबरीवर आधारित हे नाटक असणार असून या नाटकांचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करणार आहे. नाटक दिग्दर्शित करण्याची दिग्पालची ही पहिलीच वेळ आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रसाद वालावलकर करणार असून या नाटकाला पार्श्वसंगीत नुपूरा निफाडकर यांनी दिले आह तर वेशभूषा पोर्णिमा ओक यांची आहे. या नाटकाची निर्माती अभिनेत्री मुक्ता बर्वे आहे. मुक्तासोबत सुजाता मराठे या नाटकाची निर्मिती करत आहेत. मुक्ताने याआधी कोड मंत्र या नाटकाची निर्मिती केली होती. सखी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांना आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याने सखी प्रमाणे अस्मिता या मालिकेत देखील काम केले होते. एक अभिनेता हीच केवळ दिग्पालची ओळख नाहीये. तो एक चांगला लेखक देखील आहे. तू माझा सांगाती या मालिकेची कथा त्याने लिहिली होती. दिग्पालने आज एक अभिनेता आणि लेखक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षभरापासून तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये झळकत नसल्याने तो कुठे आहे याची सध्या चांगलीच चर्चा सुरू होती. तो त्याच्या एका प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचे म्हटले जात होते. त्याचे हे प्रोजेक्ट म्हणजे त्याचा आगामी चित्रपट असून या चित्रपटाची त्याने नुकतीच सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे. या चित्रपटात दिग्पाल प्रेक्षकांना अभिनेत्याच्या नव्हे तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दिग्पालचा ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास प्रचंड आहे. अनेक संत, महापुरुष यांच्याविषयीचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. त्याने प्रचंड अभ्यास करून तू माझा सांगाती ही मालिका लिहिली होती आणि आता त्याने एका ऐतिहासिक विषयावर चित्रपट बनवला आहे. दिग्पालच्या चित्रपटाचे नाव फर्जंद असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. हा चित्रपट एक शिवकालीन युद्धपट असून मे २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्पाल गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असून या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. Also Read : लेखक अभिनेता दिग्पाल लांजेकरच्या एकपात्रीवर बनणार पुस्तक