Veteran Actor Pradeep Patwardhan Passed Away : आपल्या अभिनयाने नाट्य आणि सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. आपल्या गिरगाव योथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.महाविद्यालयापासून त्यांनी एकांकिकांमधून अभिनयास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा व्यावसायिक रंगभूमीकडे वळवला. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांची भूमिका अतिशय गाजली. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. अर्थात इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. ‘सह्याद्री’ वाहिनीवरच्या ‘दुसरी बाजू’ या कार्यक्रमात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला अभिनय प्रवास, त्यादरम्यानचा संघर्ष असं सगळं सांगितलं होतं.
खूप झाली नाटकं... आईने दिली होती तंबीहोय, लहानपणापासून प्रदीप पटवर्धन अभ्यासात अतिशय हुशार होते. पहिली ते सातवी त्यांनी कधीच पहिला नंबर सोडला नाही. पण नंतर हा नंबर घसरत गेला. अगदी अकरावीत ते दोनदा नापास झालेत आणि आईबाबाचं टेन्शन वाढलं. आता या पोराचं कसं होणार? म्हणत बाबा डोक्यावर हात मारून बसले. दोन प्रयत्नानंतर अकरावीत काठावर पास झाल्यावर प्रदीप यांनी सिद्धार्थ कॉलेजला अॅडमिशन घेतली. याच कॉलेजमध्ये त्यांनी नाटकांत काम करायला सुरूवात केली. सुरुवातीला पोराला नाटकांत बक्षिसं मिळताना पाहून आईबाबांना बरं वाटायचं. पण नंतर वय वाढायला लागल्यानंतर आपल्या पोराला नोकरी नाही, म्हटल्यावर आई बाबाच्या टेन्शनमध्ये आणखी भर पडली. याबद्दल प्रदीप पटवर्धन यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.
ते म्हणाले होते, ‘बीकॉमपर्यंत मी कसाबसा पोहोचलो होतो. सोबत नाटकही सुरू होतं. एकांकिका स्पर्धेत काम करत असल्यामुळे रात्रीबेरात्री घरी यायचो. नंतर नंतर आईला याचा खूप त्रास व्हायला लागला. अगदी एक दिवस आई मला म्हणालीच, मला अटॅक वगैरे येईल. तू हे असं वागणं बंद कर, नाटक बंद कर. यानंतर एक वेळ अशी आली की, मला घरून कडक शब्दांत तंबी दिली गेली. या वर्षभरात नोकरी बघ नाहीतर पुढच्या वर्षीपासून बोरीवलीत रिक्षा चालवायला जायचं. खूप झाली तुमची नाटकं वगैरे... कारण त्याआधी मी अनेक नोक-या केल्यात होत्या. अगदी हॉटेलात ग्लास वगैरे पुसण्याचं काम केलं. सेल्स बॉय म्हणून कामाला होता. रिझर्व्ह बँकेत 25 रूपये रोजाने टायपिस्ट होतो. पण मनासारखी नोकरी नव्हती. त्यामुळे आईला माझ्या नोकरीची चिंता होती. सुदैवाने पुढे मला बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लागली. मी घरी आलो आणि आईला सांगितलं. आई मी 17 जूनपासून नोकरीला जातोय, म्हटल्यावर तिचा विश्वास बसेना. चल तू खोटं बोलतोयस तू... असं ती मला म्हणाली. आईने शेजा-याला बोलावून बँकेचं लेटर बघून खात्री करून घेतली आणि मला जवळ घेतलं. आता तू नोकरी नाही सोडायचीस आणि नाटक पण सोडायचं नाहीस...,असं ती मला म्हणाली....,’ हे सांगताना प्रदीप पटवर्धन यांना अश्रू अनावर झाले होते.