आपल्या सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारे दिवंगत अभिनेता म्हणजे प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) . नाटक म्हणू नका की सिनेमा, प्रत्येक कलाकृतीमधून त्यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यामुळे आजही त्यांच्या अभिनयाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. प्रदीप पटवर्धन यांनी गिरगावमध्ये त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. आजही त्यांच्या अभिनयातून ते प्रेक्षकांमध्ये जिवंत आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे.
प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयापासून अभिनयाची सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याच एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. सुरुवातीला घरातल्यांना त्यांचा अभिनय, यश आवडत होतं. मात्र, एका ठराविक वळणावर त्यांनी थेट प्रदीप यांनी नाटक बंद करुन, कामाधंद्याचं काही तरी बघ असं ठणकावून सांगितलं. याविषयी त्यांनी ‘सह्याद्री’ वाहिनीवरच्या ‘दुसरी बाजू’ या कार्यक्रमात दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं.
शाळेत असताना मी हुशार होतो. सातवीपर्यंत मी कधीच पहिला नंबर सोडला नाही. पण, पुढे हा नंबर घसरत गेला. मी अकरावीत २ वेळा नापास झालो आणि घरातल्यांचं टेन्शन वाढलं. आता या पोराचं कसं होणार?असा विचार करुन बाबांना काळजी वाटायची. अकरावीत २ वेळा नापास झाल्यावर शेवटी ते काठावर पास झाले. त्यानंतर त्यांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाली. परंतु, येथेच त्यांना अभिनयाचं वेड लागलं.
"मी बी. कॉमपर्यंत कसाबसा पोहोचलो. सोबत नाटकं करत होतो, एकांकिका स्पर्धेत भाग घेत असल्यामुळे रात्ररात्र घराबाहेर रहायचो. सुरुवातीला माझी नाटकं वगैरे आई-बाबांना आवडत होती. परंतु, नंतर नंतर त्यांना माझ्या करिअरची चिंता वाटू लागली. आई खूप कंटाळली होती. एक दिवस आई मला थेट म्हणाली, की तुझं हे वागणं बंद कर नाही तर मला हार्ट अॅटक वगैरे येईल", असं प्रदीप पटवर्धन म्हणाले.
पुढे ते सांगतात, "एक वेळ तर अशी आली होती की मला घरात कडक शब्दांत तंबी दिली होती. या वर्षभरात नोकरीचं काहीतरी बघ नाही तर पुढच्या वर्षापासून बोरिवलीमध्ये रिक्षा चालवायला जा. खूप झाली तुमची नाटकं वगैरे. मुळात मी यापूर्वी अनेक नोकऱ्या केल्या होत्या. अगदी हॉटेलमध्ये ग्लास पुसण्यापासून ते सेल्स बॉयपर्यंत सगळी कामं केली होती. रिझर्व्ह बँकेत २५ रुपये रोजाने टायपिस्टचं कामही केलं होतं. पण मनासारखी नोकरी नव्हती. मात्र, सुदैवाने पुढे मला बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लागली. मी घरी आलो आणि आईला सांगितलं. आई मी 17 जूनपासून नोकरीला जातोय, म्हटल्यावर तिचा विश्वास बसेना. चल खोटं बोलतोयस तू... असं ती मला म्हणाली. शेवटी शेजारच्या माणसाला बोलावून तिने ते बँकेचं लेटर वाचून घेतं तेव्हा तिला खात्री पटली. त्यानंतरआता तू नोकरी नाही सोडायचीस आणि नाटक पण सोडायचं नाहीस...,असं तिने आवर्जुन सांगितलं होतं."