Join us

लग्नापूर्वीच प्रसाद-मंजिरी झाले होते एकमेकांचे नवरा-बायको; 'क्रॉस कनेक्शन' ठरलं दोघांसाठी खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 16:46 IST

Manjiri Prasad Oak:काही दिवसांपूर्वीच मंजिरीने अभिनेत्री पल्लवी अजयच्या असोवा( AaSoVa) या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिची आणि प्रसादची पहिली भेट, मैत्री, प्रेम यांविषयी भाष्य केलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद ओक (prasad oak) आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak). प्रसादप्रमाणेच मंजिरीही कलाविश्वात सक्रीय असून तिने प्रसादसह अनेक चित्रपटांसाठी असिस्टंट डारेक्टरचं काम केलं आहे. इतरकंच नाही तर ती वेगवेगळ्या ब्रँडसोबत कोलॅबोरेशही करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. मंजिरी आणि प्रसाद यांचं लव्ह मॅरेज असून अलिकडेच एका मुलाखतीमध्ये तिने तिची भन्नाट लव्ह स्टोरी सांगितली आहे.

काही दिवसांपूर्वीच मंजिरीने अभिनेत्री पल्लवी अजयच्या 'असोवा' ( AaSoVa) या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिची आणि प्रसादची पहिली भेट, मैत्री, प्रेम यांविषयी भाष्य केलं.

"प्रसाद एक अॅक्टिंगचं वर्कशॉप घ्यायचा. साधारणपणे आमचं वर्कशॉप तीन-साडेतीम महिन्यांचं होतं. त्यात मी भाग घेतला होता. त्यामुळे मी त्याची विद्यार्थिनी होते आणि तो आमचा दिग्दर्शक. हे वर्कशॉप संपत असताना त्याने एक महोत्सव आयोजित केला होता. ज्यात त्याच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याने काही एकांकिका सादर केल्या होत्या. यात त्याने पाच एकांकिका बसवल्या होत्या आणि या सगळ्यात प्रत्येक विद्यार्थ्याला कास्ट केलं होतं. फक्त मी एकटीच राहिले होते जिला कशातच घेतलं नव्हतं. त्यावेळी आमचं काही रिलेशन वगैरे नव्हतं. त्यामुळे माझं असं झालं की, मी सुद्धा पैसे भरलेत मग मलाही काम मिळायला हवं. म्हणून मी त्याला भेटले आणि सांगितलं की मलाही काम करायचंय. त्यावर, तुझ्यासाठीही काम शोधतोय असं त्याने मला सांगितलं. या काळात कामाच्या निमित्ताने आमचा कॉन्टॅक्ट वाढला होता आणि एकमेकांना आम्ही आवडू लागलोय हे आम्हाला कळू लागलं होतं", असं मंजिरी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्याच वर्षी एका दिवाळी अंकात त्याला क्रॉस कनेक्शन ही एकांकिका सापडली. दोन पात्रांची कॉमेडी एकांकी होती, ज्यात फक्त नवरा आणि बायको होते. त्या त्याने मला कास्ट केलं. पण, मग नवऱ्याची भूमिका कोण करणार हा प्रश्न होता. अखेर मित्रांच्या सांगण्यावरुन प्रसादने नवऱ्याची भूमिका साकारली. या एकांकिकेमुळे आम्ही जवळ आलो आणि आमचं नातं सुरु झालं. त्यामुळे 'क्रॉस कनेक्शन' आमच्यासाठी खास आहे."

दरम्यान, अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तीदेखील कलाविश्वात सक्रीय आहे. इतकंच नाही तर ती अनेक ब्रँडचं प्रमोशनही करत असते त्यामुळे सध्याच्या घडीला चर्चेत राहणाऱ्या मराठी सेलिब्रिटींमध्ये तिचं आवर्जुन नाव घेतलं जातं.

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीसिनेमा