सध्या मराठी सिनेमांवरही वाद पाहायला मिळत आहेत. अनेक चित्रपटांच्या कथा, संदर्भांवरून वातावरण ढवळून निघालं आहे. अशात अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) यांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. नुकताच प्रसादनं ‘गोदावरी’ हा सिनेमा पाहिला. निखिल महाजन दिग्दर्शित, जितेंद्र्र जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गोदावरी’च्या पार्श्वभूमीवर प्रसाद ओकने पोस्ट लिहिलीये. सध्याच्या गढूळ वातावरणात चांगला सिनेमा पाहिल्याचं त्याने म्हटलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये प्रसाद लिहितो,लेखकाला जे कागदावर म्हणायचंय ते आणि दिग्दर्शकाला जे पडद्यावर म्हणायचंय ते जेव्हा संपूर्ण टीम ला 100 % कळलेलं असतं तेव्हा ‘गोदावरी’सारखा चित्रपट निर्माण होतो..!! सध्याच्या गढूळ वातावरणात जर मराठी चित्रपटाचं ‘पावित्र्य’ म्हणजे काय ते जाणून घ्यायचं असेल तर ‘गोदावरी’ पहायलाच हवा. प्राजक्त चं नितांत नितळ लेखन.निखिल चं तितकंच तरल दिग्दर्शन.सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय. विक्रम काकांबद्दल मी काय बोलू??ते ‘बाप’ आहेत आणि कायमच रहाणार. मोने आणि नीनाताई अप्रतिम. प्रियदर्शन आणि मोहित टाकळकर लाजवाब. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो गौरीचा आणि आमच्या जित्याचा. कॅमेऱ्यासमोरची सहजता म्हणजे काय, सट्ल अभिनय म्हणजे काय ते गौरीनी आणि भूमिका उमजून काम करणं म्हणजे काय, इंटेन्स अभिनय म्हणजे काय ते जित्यानी क्षणोक्षणी सिद्ध केलंय.ए व्ही प्रफुलचंद्र चं नकळतपणे येणारं पार्श्वसंगीत हि या चित्रपटाची अत्यंत महत्वाची बाजू. संकलनामुळे चित्रपटाला आलेला ‘ठेहेराव’ खूप मोलाचा आहे.‘समृद्ध’ मराठी चित्रपट म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर गोदावरी नक्की पहा.
अभिनेता प्रसाद ओक हा मराठी इंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वत:चं स्थान निर्माण केलयं. नुकताच तो ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात प्रसादनं साकारलेले आनंद दिघे लोकांना भावले. प्रसादच्या ‘धर्मवीर’ या सिनेमातील भूमिकेचं खूपच कौतुक झालं.