अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मराठी प्रेक्षकांचा तो लाडका अभिनेता. अतिशय कष्टाने प्रसादने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. या प्रवासात त्याची बायको मंजिरीने तिला भक्कम साथ दिली. म्हणून बायकोचा विषय येतो तेव्हा प्रसाद तिच्याबद्दल अगदी भरभरून बोलताना दिसतो. याऊलट अन्य नातेवाईक मात्र त्याला नकोसे वाटतात. होय, एका मुलाखतीत प्रसाद त्याच्या नातेवाईकांबद्दल जरा स्पष्टच बाेलला.‘इसापनीती’ या युट्यूब चॅनलला प्रसादने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तो नातवाईकांबद्दल परखडपणे बोलला.
काय म्हणाला प्रसाद? माझ्या यशात माझी बायको मंजिरीचा १०० टक्के वाटा आहे. १९९६ साली तिने मला पुणे सोडून मुंबईला जाण्यास सांगितलं. तिच्यामुळेच आज मी इथे आहे. मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी १९९८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरही एक वर्ष मी एकटाच मुंबईत होतो. त्यानंतर १९९९ मध्ये मंजिरी मुंबईला आली. त्यानंतर आमचा संसार सुरू झाला. या संपूर्ण प्रवासात घर, मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण आणि नातेवाईक हे सगळं तिने सांभाळलं.
सुरुवातीच्या काळात नातेवाईकांकडून मला बरंच काही ऐकायला मिळालं. अभिनय हे काय क्षेत्र आहे? यात काय करिअर होणार आहे का? यापेक्षा चांगली बँकेत नोकरी बघितली असतीस…वगैरे म्हणणारे नातेवाईक आज २२-२५ वर्षांनंतर त्यांच्या मुलांना माझ्याबरोबर फोटो काढायला पाठवतात. हेही मला आवडत नाही. नातेवाईक हा प्रकार मला नका नकोसा वाटतो. कारण त्यांच्याकडून मला कधी काही चांगलं नाही मिळालं दुर्दैवाने. हे वास्तव आहे. आज ते ही मुलाखत ऐकत असतील तर त्यांना वाईट वाटेलही. पण वाटू दे, त्यात मी काहीही करू शकत नाही. मला जे काही दिलं ते बायकोने दिलं. माझ्यावरचे संस्कार माझ्या शिक्षकांनी दिले. माझ्यातलं गाणं माझ्या आईकडून आलं. नातेवाईकांनी मला काहीही दिलं नाही, असं प्रसाद म्हणाला.
प्रसादने दिग्दर्शित केलेला 'चंद्रमुखी' हा सिनेमा प्रचंड गाजला. त्याने 'धर्मवीर' या सिनेमात साकारलेली भूमिका तुफान गाजली. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे.